ylliX - Online Advertising Network

Nashik Main Road मेन रोडवरील मोबाइल डिलर ई-मेलद्वारे नफ्याचे आमिष दाखविले सुमारे चार कोटी रुपयांना गंडा

औरंगाबादच्या आठ व्यावसायिकांना मेन रोडवरील एका मोबाइल डिलर्सकडून सुमारे चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस  आला आहे. या प्रकरणी औरंगाबादचे व्यावसायिक आदित्य राधेश्याम मालीवाल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित डिलर्सविरुद्ध फिर्याद दिली आहे. यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांचा शोध सुरू झाला असून, त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, अशी माहिती भद्रकाली पोलिसांनी दिली. Nashik Main Road

रिअलमी मोबाईल कंपनीचे नाशिकमध्ये ईगल इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लि. हे अधिकृत वितरक (डिस्ट्रीब्युटर) होते. या कंपनीचे संचालक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकिसन खेमानी व श्रीनाथ अहिरवाडकर यांच्यामार्फत राज्यातील काही वितरकांना मोबाईल विक्रीसाठी दिले जायचे.

भद्रकाली पोलिस ठाण्यात आदित्य राधेश्याम मालीवाल (रा. औरंगाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, ईगल इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या या सहा संचालकांनी गेल्या ५ मार्च २०२० ते १५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत मेन रोड येथील वावरे लेनमधील द्वारकानाथ कॉम्प्लेक्स येथे तक्रारदार पारस गौतमचंद छाजेड (रा. औरंगाबाद), यासिर अब्दुल रशीद बागवान (रा. कोल्हापूर), प्रमोद श्यामसुंदर सोनी (रा. इचलकरंजी), सुयोग कलानी (रा. सोलापूर), सुहास गजानन उनउणे (रा. कराड), मोहसीन जावेद कादरी (रा. बीड), आनंद सुभाष लोढा (रा. कोपरगाव, जि. नगर) यांच्याकडून मालापोटी आगाऊ रक्कम घेतली.

बनावट ई-मेलद्वारे फसवणूक
संशयित खेमानी यांनी मालीवाल यांना अधिक नफ्याचे आमिष दाखवून  ‘सुपरमनी’ कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना ३५ लाखांची मर्यादा ठरवून दिली. १ जुलै, २०२२ रोजी खेमानी  यांनी मालीवाल यांच्या संमती न घेता, १२ लाख ६४ हजार ७५४, १० लाख ५१ हजार १८१, आणि १० लाख ८४ हजार ०६५ रुपये कंपनीच्या बँक खात्यामधून अन्य खात्यात वर्ग करून घेतले.

नवीन ‘स्कीम’ सांगून ७० लाख
संशयित खेमानी यांना मालीवाल यांनी रक्कम का खात्यातून वर्ग केली, असे विचारले असता, त्यांनी नवीन ‘स्कीम’ येणार आहे, त्यासाठी ८० ते ९० लाखांची गुंतवणूक करा, यापेक्षाही जास्त नफा होईल, असे सांगितले. मालीवाल यांनीही आमिषापोटी स्वत:च्या खात्यात ७० लाख ८  हजार रुपये भरणा केला.

मेन रोडवरील वावरे लेनमधील  ईगल इलेक्ट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.चे संचालकांविरुद्ध मालीवाल यांनी फिर्याद दिली आहे. औरंगाबादच्या व्यावसायिकांना ई-मेलद्वारे जादा नफ्याचे आमिष दाखविले व लाखो रुपये उकळले; संशयिताने या बदल्यात कुठल्याही प्रकारच्या मोबाइलचा पुरवठा केला नाही. संबंधित मोबाइल कंपनीच्या मुख्य डिलर्सकडे चौकशी केली असता, ही बाब उघड झाली. मोबाइलच्या मालाचा पुरवठा करण्यासाठी संशयित व्यावसायिक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकिसन खेमानी आणि कंपनीचे व्यवस्थापक श्रीनाथ अहिरवाडकर यांनी आगाऊ रक्कम व्यावसायिकांकडून घेतली. ऑगस्ट महिन्यात मोबाइलचा माल पुरविला नाही, तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली. व्यावसायिकांनी मोबाइल कंपनीकडे  चौकशी केली असता, त्यांनी ही कंपनी आता आमची अधिकृत विभागीय वितरक नसल्याचे सांगितले. Nashik Main Road

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.