राज्य बॅडमिंटन स्पर्धा : मानांकित खेळाडूंची आगेकूच; स्पर्धेत रंगत

नाशिक : नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेली द्वितीय राज्य निवडचाचणी स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे सरकत असून स्पर्धत नाशिकच्या खेळाडूंनी उपउपांत्यपूर्व फेरीत कूच केली आहे. स्पर्धेत एकूणच नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई ग्रेटर, मुंबई उपनगर, सांगली, ठाणे या जिल्ह्यातील खेळाडूंचा दबदबा राहिला आहे.

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटना आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे १६ ते २० जुलै दरम्यान आयोजित या स्पर्धेत बुधवारी (दि. 18) 15 वर्षाखालील गटात नाशिकच्या शुभम अहिरे याने नागपूरच्या तिसऱ्या मानांकित सिद्धांत बावनकारचा 15-11, 15-10 असा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. तर गहिर जगतार आणि प्रज्वल सोनवणे यांनी याच गटात उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

13 वर्षाखालील मुलांच्या एकेरी गटात पहिल्या मानांकित प्रज्वल सोनवणे याने नागपूरच्या आगम मेहता याचा 21-11,21-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिसऱ्या मानांकित पार्थ देवरेने मुंबई उपनगरच्या सिद्धांत फडणीसचा 15-8, 15-6, पार्थ लोहकरे याने नागपूरच्या आर्यन साधनकार याचा 15-9, 15-11 असा पराभव करत अव्वल 16 खेळाडूंत स्थान मिळवले. मात्र पुढच्या फेरीत त्याचा ओम गावंडी याने 21-8, 21-8 असा पराभव पत्करावे लागले आहे. 13 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात वरदा एकांडे हिने चांगली लढत दिली मात्र मुंबई उपनगरच्या सिया सिंग या खेळाडू विरुद्ध तिला 24-22, 21-13 असा थोडक्यात पराभूत व्हावे लागले. यावेळी नाशिकच्या उपस्थित खेळाडूंची साथ मिळत होती.
13 वर्षाखालील दुहेरीत ठाण्याच्या ओम गावंडीह खेळताना प्रज्वल सोनवणे, अमन सोनवणे आणि पार्थ लोहकरे यांच्या जोडीने तर मुलींमध्ये श्रावणी वाळेकर आणि वरदा एकांडे यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर 15 वर्षाखालील मुली आणि मुलांच्या गटात खेळाडूंची उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी स्पर्धा सुरु होती.
15 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत गहिर जगतार आणि विपुल चाफेकर या नाशिककर जोडीने सांगलीच्या ओंकार भंडारी आणि सुदर्शन वडार जोडीचा 15-7, 15-10 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तर मुलींच्या गटात नाशिकच्या तब्बल 4 जोड्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आकांक्षा साळुंके आणि तनुश्री खोलगडे यांनी नागपूरच्या प्रिशा भाटी आणि सिया मुंडले यांचा 15-12, 15-9 असा पराभव केला. देवांगी जाधव आणि रिद्धी कांडोई यांनी नागपूरच्या अन्वी राऊत आणि निशिका गोखे या जोडीचा 15-9, 15-1 असा पराभव केला. तर अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मिहिका थत्ते आणि तरल अखेगावकर या जोडीने नागपूरच्याच अदिती तडस आणि विधी आथिलकर यांचा 12-15, 15-4, 15-9 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर प्रचंड ऊर्जेने पुनरागमन करत सलग दोन सेट जिंकत सामना खिशात घातला. तर भारवी कांकरिया आणि साक्षी कोठावदे जोडीने ठाण्याच्या आयुषी धुरी आणि वैष्णवी घाग जोडीचा 15-6, 15-6 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यफेरीत आपले स्थान पक्के केले.
अन्य सामनेही अटीतटीचे होत असून स्पर्धेतील योग्य गौणवत्ता आणि प्राविण्य असलेले खेळाडू आपली ताकद दाखवत आगेकूच करत आहेत. स्पर्धेत आज गुरुवारी उपांत्य फेरीचे सामने रंगणार असून शुक्रवारी (दि. 20) अंतिम सामने रंगणार आहेत. हे सामने बघण्यासाठी जास्तीतजास्त नाशिककरांनी यावे असे आवाहन एनडीबीएचे सचिव अनंत जोशी यांनी केले आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.