युवकच उद्याच्या जगाचा वारसा…

अभिजीत दिघावकर

आज (१२ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय युवक दिन. भारताला या युवा मनुष्यबळाचा फायदा करून घेण्यासाठी युवकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, तसेच आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय यांमध्ये समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला भारताची हीच वाढती लोकसंख्या भविष्यात देशासाठी चिंतेचा हि विषय आहे कारण वाढत्या लोकसंख्येसोबतच विविध समस्यांना भारताला तोंड द्यावे लागणार असून, युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, आरोग्य आणि इतर विविध स्तरात भारताने सज्ज राहायला हवं. त्यानिमिताने लिहिते झालेत अभिजित दिघावकर…

जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, समाजामध्ये सक्रिय होऊन सकारात्मक योगदान देण्यासाठी आणि युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीन विकास साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. 1999 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (united nations) सर्वसाधारण सभेत (general assembly) एक ठराव पारित होऊन 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळण्यात येण्याचे ठरले आणि त्यानंतर 2000 सालापासून दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

“Transforming Education” ही या युवक दिन 2019 साठीची संकल्पना ठेवण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2030 पर्यंत एकूण 17 विभागात शाश्वत विकासाचे जे ध्येय गाठण्याचे ठरविले आहे, त्यात मूळ 4 क्रमांकाचे शिक्षणाबद्दलचे असलेले ध्येयधोरण ह्या वर्षीची संकल्पना ठरविण्यासाठी अंगिकारले गेले आहे. त्यानुसार “सर्वसमावेशक, योग्य दर्जा आणि गुणवत्ता असलेलं शिक्षण, सर्वांना आयुष्यभरासाठी शिकण्याची समान संधी उपलब्ध करून देणे” हे मुख्य ध्येय आहे.

विकसित राष्ट्रांनी आज जी काही प्रगती केली आहे, ती त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या युवा मनुष्यबळाच्या माध्यमातूनच शक्य झाली असून आज मात्र त्यांच्याकडील युवकांची संख्या कमी होताना दिसत आहे, आणि तीच युवा लोकसंख्या विकसनशील राष्ट्रांमध्ये वेगाने वाढत असून त्यात भारत अग्रेसर आहे. भारताच्या लोकसंख्ये पैकी सुमारे 50% लोकसंख्या 25 वर्षांच्या आतील आहे तर 65% लोकसंख्या 35 वर्षांच्या आतील आहे. युवकांची हीच प्रचंड संख्या भारता सारख्या विकसनशील देशाला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसविण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण, युवकच उद्या जगाचा वारसा घेणार असून, राष्ट्राचा विकास हा तरुणाईचा कल्पकतेने, कुशलतेने आणि सक्रियपणे वापर करूनच आजपर्यंत झालेला आहे.

परंतु भारताला या युवा मनुष्यबळाचा फायदा करून घेण्यासाठी युवकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, तसेच आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय यांमध्ये समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला भारताची वाढती लोकसंख्या भविष्यात देशासाठी चिंतेचा विषय आहे. कारण, वाढत्या लोकसंख्येसोबतच विविध समस्यांना भारताला तोंड द्यावे लागणार असून, युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, आरोग्य आणि इतर विविध स्तरात भारताने सज्ज राहायला हवं.

बेरोजगारी आणि त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती कडे कल वाढणे, सोशल मीडियाचा अतिवापर, युवकांमधील वाढतं नैराश्य आणि असंतोष, यांसारख्या विविध समस्यांना वेळीच पायबंद घालणे गरजेचे असून युवापिढीला सकरात्मक बनवून विविध योजनांमध्ये सामावून घेणे, सक्रिय करणे, निर्णय प्रक्रियेत स्थान देणे, संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

यावर्षीचा आंतरराष्ट्रीय युवक दिवस 2019 संयुक्त राष्ट्रसंघाच्या डिपार्टमेंट फॉर इकॉनॉमिक अँड सोशल अफेर्स (DESA) च्या अंतर्गत येणारे डिव्हिजन फॉर इन्कलुसिव्ह सोशल डेव्हलपमेंट (DISD) आणि युनेस्को (UNESCO) म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केली जात असून, यात सर्व सदस्य राष्ट्र, संयुक्त राष्ट्रांचे भागधारक, युवकांशी संबंधित संस्था आणि शैक्षणिक संस्था यांचा समावेश असून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देऊन युवा पिढीला सक्षम करणे, शांत आणि समृद्ध समाज निर्माण करणे, त्यामाध्यमातून सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधने हेच या आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे महत्व असेल.

(लेखक हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीचे जागतिक युवा राजदूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करतात.)

world youth day united nations 12 august abhijeet dighaokar

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “युवकच उद्याच्या जगाचा वारसा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.