आयडीया कॉलेजचा ‘व्हर्टिकल स्टुड‌िओ: विद्यार्थ्यांनी शोधले स्मार्ट सिटीच्या रस्ते समस्यांवर तोडगे

आयडीया कॉलेजचा व्हर्टिकल स्टुड‌िओसंपन्न

विद्यार्थ्यांनी शोधले स्मार्ट सिटीच्या रस्ते समस्यांवर तोडगे

सुचविले सोपे आणि सहज मार्ग, सुशोभिकरणाचाही केला विचार

नाशिक : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरातील रस्त्याना वाहतूक कोंडी, पार्किग, अतिक्रमण आदी समस्यांनी ग्रासलेले आहे. मग तो कॉलेजरोड असो वा गावातला सराफ बाजार, एम. जी रोड, अगदी नाशिकरोडचा उड्डाण पुल ते गोदापार्कचा शहीद पूल. याच सगळ्या रस्त्यांचा अभ्यास करून या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न आयडीया कॉलेजच्या ‘व्हर्टिकल स्टुड‌िओ’ या चार दिवसीय डिझाईन वर्कशॉपच्या निमित्ताने करण्यात आला आहे. सोबतच या रस्त्याचे आर्किटेक्चरच्या माध्यमातून सुशोभिकरण करत शहर सौंदर्यात कशी भर टाकता येईल याचाही यात स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे. सदरच्या अभ्यासाचे सादरीकरण सोमवारी कुसुमाग्रज स्मारकात करण्यात आले.

यावेळी आयडीयाचे संचालक विजय सोहनी, डीन विवेक पाटणकर सोबतच यंदा ‘व्हर्टिकल स्टुड‌िओ’ ला आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये मार्टीना स्पाईस, जयेश गणेश, निखील मिजार, प्राजक्ता चक्रवर्ती, राहुल चेंबूरकर, रोहित मुजुमदार, विश्वेश विश्वनाथन आणि कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिकमध्ये विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हार्मेंट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात आयडिया कॉलेज कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी  कॉलेजकडून नेहमीच नवनविन उपक्रम राबविले जातात. याअंतर्गत दरवर्षी ‘व्हर्टिकल स्टुड‌िओ’ चे आयोजन केले जाते. यंदा ‘आर्किटेक्चर आणि स्ट्रीट’ असा विषया देण्यात आला होता.  यात विद्यार्थ्यांनी एखाद्या ऑफीसमध्ये प्रोजेक्टवर ज्यापद्धतीने काम करतात.

अगदी तसेच प्रती ऑफिस थाटून व्यवसायिक पद्धतीने काम केले. यासाठी विद्यार्थ्यांचे सात ग्रुप पाडण्यात आले. पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष भेट देण्यात आली. मग रस्त्यांचे मोजमाप, सर्वेक्षण, मुलाखती, स्केचेस काढून आदीच्या माध्यमातून रस्ता समजून घेतला. त्यानंतर तेथील समस्याचा अभ्यास केला. शेवटी मग तोडगा सुचवण्यात आला आहे. त्यासाठी मोडेल्स बनवण्यात आली असून चित्रफितीचाही वापर करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये शहरातील कृषीनगर, कॉलेजरोड, ठक्कर बाजार, सराफ बाजार, फुल बाजार, गोदापार्कचा शहीद पूल, नाशिकरोडचा उड्डाण पूल आदीचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास खालीलप्रमाणे

सीबीएस..सिव्हील हॉस्पिटल परिसर

नाशिक शहरात आलेला पर्यटक ठक्कर बाजारला उतरल्यानंतर मेळा स्थानकाजवळच्या रस्त्याने गावात येतो. यावेळी शवागारातून येत असलेल्या वास, वाहूतक कोंडी असे चित्र दिसते. राज्यातील मोठे बाल सुधारगृह दिसते. मग हे चित्र बदलण्यासाठी त्या मोठ्या भिंतीवर संदेशपर चित्रे काढून सकारात्मकता आणता येऊ शकते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान फुटपाथ बांधले जाऊ शकतात. जेणेकरून लोक चालू शकतील. तर कॉलेजरोडला एका बाजूला सधन, श्रीमंती सांगणारा परिसर दिसतो. आणि लागूनच सिद्धार्थनगरची झोपडपट्टी दिसते. इथली दुर्गंधी, कचरा, लहान मुले आदी रस्त्यावर दिसते. याचा अभ्यास केला असता इथे अंगणवाडी आहे.

मात्र तिचा हवातसा वापर केला जात नाही. अस्वच्छता आहे. मग त्या अंगवाडीच्या बाहेर बगीचा तयार केला तर मुलांना खेळण्यासाठी चांगली जागा मिळेल. महापालिकेने दिलेल्या कचराकुंडीचा वापर करण्यासाठी लोकांचे प्रबोधन गरजेचे आहे. इथे स्वच्छता ठेवली तर उपलब्ध असलेल्या जागेत छोटेसे हॉटेल सुरु करणे ही सहज शक्य आहे. यातून रोजगार निर्मिती ही शक्य आहे. अजून थोडे पुढे गेल्यावर नंदन स्वीटसजवळ वाहतूक कोंडी, तरुणाची गर्दी दररोज दिसते. येथे तरुण मंडळी सिगरेट ओढताना दिसतात. रात्री अंधाराचा फायदा घेतांना दिसतात. या ठिकाणी असलेले पथदीप कायम बंदच असतात. या ठिकाणी सर्वात पहिले लाईट लावणे गरजेचे आहे. त्यानंतर रस्त्यावर असलेले अतिक्रम काढून फुटपाथ बनवता येईल. जेणेकरून लोक चालू शकतील. इथे सुशोभीकरण करता येईल. रस्त्याला दुभाजकही नाही. तो देखील लावता येऊ शकतो.

शहीद पूल (बापू पूल) बनवता येईल हैप्पी स्ट्रीट

सध्या बापू पूल तरुणाईच्या अश्लील चाळ्यामुळे बदनाम झाला आहे. याठिकाणी असलेल्या रस्त्याचे अवघे रूप बदला येईल. याला ‘हैप्पी स्ट्रीट’ बनवता येईल. दर आठवड्याला मनोरंजनचे कार्यक्रम येथे घेणे शक्य आहे. जसे मॉलमध्ये ब्रांड प्रमोशनचे कार्यक्रम असतात. तशा कार्यक्रमासाठी येथे जागा उपलब्ध होऊन ‘ब्रांड स्ट्रीट’ तयार करता येईल.  भिंत उभारून लोकांना त्यावर चित्रे, कविता आदी काढण्याची संधी उपलब्ध करता येऊ शकते. त्यामुळे रस्त्याला ‘आर्ट स्ट्रीट’ ही बनवता येईल. या ठिकाणी संध्याकाळी अनेक जेष्ठ नागरिक आणि लहान मुले असतात. त्यांना एकत्र आणूनही एखादा उपक्रम सहज सुरु करता येईल. याशिवाय विदेशात ज्याप्रमाणे  पाण्यावर तरंगत्या गाडीवर व्यायाम केला जातो असाच अतिशय वेगळा उपक्रम येथे राबवला जाऊ शकतो.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सराफ बाजार, फुल बाजार , मेनरोड,  एम. जी. रोड याचा अभ्यास केला असता या ठिकणी अनेक लहान मोठे रोजगार चालतात. स्वच्छतेचा प्रश्न, वाहतूक कोंडी आहेच.  या ठिकाणी काही मोडतोड करून काही करण्यापेक्षा आहे त्यामध्ये बदल करणे उत्तम ठरणारे आहे. वाहनांची गर्दी टाळण्यासाठी वेळेचे बंधन घालता येईल. बाजार उठल्यानंतर लगेचच कचरा उचलण्याची सोय केली तर स्वच्छता राखण्यासाठी मदत होईल. याशिवाय लोकांची होणारी गर्दी पाहाता आणखीन एक सुलभ शौचालयाची गरज दिसून येते.

नाशिकरोड उड्डाण पुलाखाली ओपन थेटर शक्य 

नाशिकरोडखाली दररोज बाजार भरतो. त्यामुळे भाजीवाल्यांनी जागा अडवली असा  विचार न करता सकारात्मक विचार केला तर त्या जागेचा खूप चांगला उपयोग केला जाऊ शकतो. भाजी बाजार संपल्यानंतरत्याचे सामानाचे व्यवस्थापन करून त्या ठिकाणी ओपन थेटर, रात्रशाळा आदी उपक्रम राबवता येऊ शकतात.  पुलाच्या पिलर्सवर चित्रे काढून सुशोभिकरण करता येईल. प्रवेशव्दारासाठी साधी कमान तयार न करता नाशिकची ओळख असलेल्या चिन्हाचा यात वापर करता येऊ शकतो.

बाईट

विजय सोहनी, संचालक, आयडीया कॉलेज, नाशिक

या कार्यशाळेतून विद्यार्थीना फिल्डवर्कचा खूप चांगला अनुभव मिळतो. यंदाचा विषय लोकांच्या जीवनाशी थेट निगडीत असा आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या शहरात फक्त रस्ते बांधून काम पूर्ण होणार नाही. तर त्या रस्त्याची उपयोगिता वाढवणे आणि त्याचे  सुशोभिकरणही गरजेचे आहे. थोडे बदल सुद्धा या ररस्त्यांची उपयोगीता वाढवतात. याचा प्रत्यक्ष अनुभव घेत त्यांनी काही उपयुक्त बदलही सुचवले आहेत.  रस्त्याच्या माध्यमातून चांगला संवाद घडवता येतो हे देखील विद्यार्थ्यांना समजले आहे.

परिणीता इनामदार, विद्यार्थी, आयडीया कॉलेज, नाशिक

व्हर्टिकल स्टुड‌िओ हा उपक्रम आम्हाला खूप आवडतो. यातून आम्हाला सर्व प्रकारची कामे करण्याचा अनुभव मिळतो. अगदी बोलण्याचा, सर्वे, मुलाखती,आदींचा. चार दिवस कुठे संपून जातात हेच कळत नाही. तज्ञ लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने अनेक बारकावे समजतात.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.