शिवजन्मोत्सव समितीचा पडलेला फलक उचलून पुन्हा लावत असताना विजेचा शॉक लागल्याने २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. वडनेर रोडवर सदरची घटना घडली आहे. Two youths killed in electric shock
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनेररोडवरील राजवाड्याकडे जाणाऱ्या चौकात शिवजन्मोत्सव समितीचा फलक लावलेला होता. गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने हा फलक कोसळला.
त्यानंतर शुक्रवारी दुपारी रस्त्याने जाणाऱ्या दोन युवकांनी हा पडलेला फलक उचलला आणि उभा केला. त्याचवेळी वीज तारांचा या फलकाशी स्पर्श झाला आणि त्याचा जबर शॉक या तरुणांना बसला. त्यात अक्षय किशोर जाधव (२६) आणि राज मंगेश पाळदे (२०) या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची दखल घेत नागरिकांनी चौघांना तातडीने बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र जाधव आणि पाळदे यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयत राज पाळदे हा एकुलता एक मुलगा होता तर जाधव यांच्या पाश्चात दोन भाऊ आहेत.