ज्ञानगंगा घरोघरी सोबत विकासगंगा दारोदारी पोहोचविण्याची गरज – ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. राम ताकवले 

मुक्त विद्यापीठाच्या २८ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा

ज्ञानगंगा घरोघरी सोबत विकासगंगा दारोदारी पोहोचविण्याची गरज – ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. राम ताकवले यांचे प्रतिपादन

 

नाशिक : मूल्यांची जोपासना करत त्यावर आधारित असलेले शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून समाजात परिवर्तन घडवून आणणे हे शिक्षण पद्धतीचे अंतिम ध्येय असले पाहिजे. आगामी काळात विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर शैक्षणिक विकासासाठी करायला हवा. एकविसाव्या शतकात सर्वसामान्यांचे लोकविद्यापीठ झाले पाहिजे यासाठी आपण आग्रही असून विद्यार्थ्यांना शिक्षणातून जगण्याची दिशा मिळेल अशी शिक्षणपद्धती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुढील काळात ज्ञानगंगा घरोघरी बरोबरच विकासगंगा दारोदारी पोहोचविण्याची गरज असून आता शिक्षण विकासाशी संबंधित करावे लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. राम ताकवले यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. राम ताकवले यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले. सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. याबरोबरच रक्तदान शिबिराचे उदघाटन,  विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण,सुरक्षा व कामगार महिला सुविधा केंद्राचे उदघाटन आणि विद्यार्थी / कर्मचारी सेवेच्या नवीन वाहनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस अभिवादनहीयावेळी करण्यात आले. यानंतर विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात प्रा. राम ताकवले यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी व्यासपीठावर  विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य तथा आमदार देवयानी फरांदे, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन हेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ. ताकवले म्हणाले, आजची शिक्षणपद्धती आशयावर आधारित आहे. आशय समजावून शिकवला जातो. त्यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो, एकविसावे शतक तंत्रज्ञान क्रांतीचे शतक आहे. हे शतक डोळ्यासमोर ठेवून मूल्यांवर आधारित नवीन शिक्षणपद्धतीचा विचार करायला हवा. तंत्रज्ञानाची सांगड आणि मूल्यांची जपवणूक हे आव्हान नवीन शिक्षणपद्धती अमलात आणण्याची गरज आहे. आधुनिक युगात तंत्रज्ञानातून सर्व समाजाला शिक्षित करता येईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. त्यातून समाज परिवर्तन घडून येईल हे या पद्धतीचे मोठे यश असेल. ज्ञान आणि विकास एकमेकांना पूरक असल्याने शैक्षणिक विकासाला गती मिळेल असेही डॉ. ताकवले यांनी सांगितले. विद्यापीठाच्या स्थापनेला २८ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत विद्यापीठाची प्रगती पाहून समाधान वाटल्याचे ते म्हणाले. समाजाला आधुनिकतेच्या दृष्टीने पुढे नेणारी शिक्षणपद्धती निर्माण व्हायला हवी. ज्ञानामुळे जीवन बदलते. एकविसाव्या शतकात ज्ञानाबरोबरच नवनिर्मितीवर भर दिला जाणार आहे. यासाठी दूरस्थ शिक्षणाशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. देवयानी फरांदे यांनी विद्यापीठाच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देवून, पुढील काळात विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देतानाच विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रांना उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लक्ष पुरविण्याची सांगितले. या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांचाही सन्मान करण्यात आला. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, डिजीटल क्रांतीमुळे समाज जीवनाशी संबंधित सर्व घटकांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रामध्ये देखील अनेक सकारात्मक बदल झाल्याचे जाणवत आहे. तसेच गरजांवर आधारित नविन शिक्षण घेण्याची तसेच अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची सोयदेखील तंत्रज्ञानावर आधारित अशा दूरशिक्षण प्रणालीद्वारे उपलब्ध झाल्याचे सांगून सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विद्याशाखांचे संचालक, प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, सुरक्षा रक्षक यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.