श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथे जागतिक अहिंसा संमेलनाची तयारी पूर्ण

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेल्या  श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथे येत्या सोमवारपासून (दि.22) तीनदिवसीय जागतिक अहिंसा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गणिनीप्रमुख आर्यिका ज्ञानमती माताजी यांनी दिली.

जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांच्या 108 फूट उंच मूर्तीची स्थापना श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथे करण्यात आली आहे. भगवान ऋषभदेव यांची ‘अहिंसा परमो धर्म’ ही शिकवण जगभरात पोहोचविताना तसेच मानवामानवामधील राग आणि मत्सर दूर होऊन त्यांच्यात प्रेमभावना निर्माण व्हावी या उद्देशाने श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथे 22 ते 24 ऑक्टोबर या काळात तीन दिवसीय संमेलन होणार आहे. आर्यिका ज्ञानमती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रज्ञाश्रमणी आर्यिकारत्न चंदनामती माताजी आणि पीठाधीश रवींद्रकीर्तीजी महाराज यांच्या नेतृत्वात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (दि.22) दुपारी 3.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे तालिका राजेंद्र पाटणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाच्या निमित्ताने मांगीतुंगी क्षेत्राला जोडणार्‍या रस्त्यांच्या डांबरीकरणासह पिण्याच्या पाण्याची, वाहनतळाची तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. या कार्यक्रमासाठी 65 हजार स्क्वेअर फूट असा भव्य मंडप टाकण्यात आला असून, जय्यत तयारी करण्यात येत आहे. इंजिनिअर सी. आर. पाटील, कार्याध्यक्ष अनिल जैन, महामंत्री संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल, पारस लोहाडे विशेष परिश्रम घेत आहेत.

संमेलनाची रूपरेषा

22 ऑक्टोबर

दुपारी 3.30 : राष्ट्रपतींच्या हस्ते

संमेलनाचे उद्घाटन

सायं. 7.30 :  ‘विश्‍वशांती अहिंसावर’

डॉ. अनुपम जैन यांचे व्याख्यान

रात्री 8  : आत्मा शांतीसाठी भक्तामर महाकाव्याच्या 48 श्‍लोकवर नाट्य

23 ऑक्टोबर

सकाळी 6 : नवग्रहशांती जैनमंदिराच्या नऊ भगवंतांचा पंचमृताभिषेक

सकाळी 7 : आर्यिका स्वर्णमती माताजी यांचे मार्गदर्शन

दुपारी 2  : अखिल भारतीय दिगंबर जैन महिला संघटनेद्वारे विश्‍वशांतीवर विशेष चर्चा

सायंकाळी 7 : श्रींची आरती

सायंकाळी 7.30 : सांस्कृतिक कार्यक्रम

24 ऑक्टोबर

सकाळी 6 : नवग्रहशांती जैनमंदिर पंचामृताभिषेक

सकाळी 7 : धार्मिक अनुष्ठान, पूजन

दुपारी 2 :  ज्ञानमती माताजी गुणानुवाद विशेष विनयांजली सभा

सायं. 7 :  आरती

सायं. 7.30 :  सांस्कृतिक कार्यक्रम

महावीर विश्‍वविद्यालयाचा सन्मान

भगवान श्री ऋषभदेव 108 फूट विशाल दिगंबर जैन मूर्ती निर्माण समितीद्वारे संमेलनात दिगंबर जैन प्रतिमा समितीने तयार केलेल्या सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा या ग्रथांचे ही यावेळी लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते मुरादाबाद येथील तीर्थंकार महावीर विश्‍वविद्यालयाला भगवान ऋषभदेव इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विश्‍वविद्यालयाचे कुलाधिपती सुरेश जैन हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. 11 लाख रुपयांचा धनादेश, शाल आणि प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी माहिती रवींद्रकीर्तीजी महाराज यांनी दिली. दरम्यान, दर सहा वर्षांनी भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीला महाअभिषेक केला जाणार आहे. यानंतर 2022 मध्ये पुढील कार्यक्रम होणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.