#तुम्हाला_नाशिककर_व्हायचं_आहे_का?

खरतर मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकर ह्यंचाच उल्लेख करून पु.लं.नि तसा आमच्यावर अन्यायच केला. कारण महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर ज्यांच्यापुढे कर जोडावे अशा जुन्या शहरात नाशिक थोडं सिनियर आहे.

असो, तर तुम्हाला नाशिककर व्हायचं आहे का? व्हा ! नक्की व्हा ! पण त्यासाठी आधी नाशिकला नाशिकचं म्हणता आले पाहिजे, उगाच सदाशिव पेठी थाटात तर सानुनासिक ‘नासिक’ म्हणाल तर तुम्ही पहिल्या फेरीत बाद व्हाल. कारण तुम्हाला कामधंद्यानिमित्त लागलेली पुणेरी हवा लगेच ओळखू येईल. खरा नाशिककर हा नासिकला ‘नाशिक’ आणि गोदावरीला ‘गंगा” म्हणतो हा अलिखित नियम आहे.

नाशिककर व्हायचं असेल तर सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना “प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकनगरीत…….” हे वाक्य सुरुवातीलाच उच्चारले नाही तर तो फाऊल गणला जातो.

godavari photo by marmik
नाशिकचे जीव की प्राण गोदावरी अर्थात गंगा छायाचित्र मार्मिक गोडसे

खऱ्या नाशिककराला श्रीरामाबद्दल जेव्हढी आस्था आहे तेवढी कुंभमेळ्याबद्दल नाही, कारण आपण मुळात श्रीरामाचे अनुयायी असल्याने पाप केलेच नाही तर धुवायचे कशाला? असा रोख सवाल ते विचारतात. घरच्या नळाला रामकुंडाचेच पाणी असते हा सार्थ विश्वास असल्याने ‘आपण पुण्य सफिशियंट कमावले असल्याने उगाच का साधुलोकाना डिस्टरब करायचं’ असा युक्तीवाद ते करतात.

नाशिकच्या जंगलात आढळणारा बिबट्या

नाशिकचं पाऊस पाणी तरं विचारू नका ! दुतोंड्या मारुती हा गेली कित्येक वर्ष पाणी कुठवर आहे हे सांगण्यासाठी रामकुंडावर तिष्ठत उभा आहे असा माझा पूर्वीपासूनच समज आहे . एकदा कि त्याने यथेच्छ जलविहार केला कि पुढची ३ वर्षे पाण्याचे टेन्शन घायच नाही.

नाशिकचे सण उत्सव हे इतर शहराप्रमाणे असले तरी होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करून कॅलेंडरचा मान ठेवायचं काम भारतात फक्त नाशिककरच करतात. त्यात पुन्हा रहाडीत उडी मारली नसेल तर तुमची रंगपंचमी वाया गेली म्हणून समझा.

नाशिककरांची राजकीय विचारसरणी हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. एकाच वेळी भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी साऱ्यांनाच आपला बालेकिल्ला नाशिक कसे काय वाटते. हे खुद्द नाशिककर सुद्धा सांगू शकत नाही. निवडून आलेल्या उमेदवाराला सुद्धा पुढच्या वेळी आपण राहू कि नाही हे शेवटपर्यत कोडे असते. त्यामुळे एकाचवेळी “राजसाहेबांशिवाय पर्याय नाही” किंवा ‘भुजबळ साहेबानींचं खरा विकास केला” अशी दोन टोकाची वाक्ये इथे ऐकता येऊ शकते.

वाईन सिटी अशी ओळख आहे पूर्ण जगात !

सांस्कृतिक क्षेत्रात मात्र नाशिकचं एक वेगळा आब आहे. कुसुमाग्रज, सावरकर, दादासाहेब फाळके अशा थोरामोठ्यांचे संस्कार झाल्याने ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ सारे आपल्यामुळेच असा समज सुद्धा नाशिककर असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे एखादे नाटक अथवा प्रयोग नाशिकमधे चालला कि तो जगात कुठेही चालू शकतो.

खाण्याच्या बाबतीत मात्र नाशिककर कमालीचे चोखंदळ आहे, मिसळ हा पदार्थ आपली जहागीर असून दुसऱ्या शहरात मिसळीच्या नावाखाली फरसाण टाकलेली आमटी खपवली जाते हा त्यांचा शुद्ध आरोप असतो.

बुध्याची जिलेबी, सलीमचा चहा, नूर महंमदचे दहीवडे, अकबरचा सोडा, सायंताराचा साबुदाणा वडा हे ज्याच्या घशाखाली उतरले नाहीत त्याने नाशिकच्या रहिवासी दाखल्यावरून आधी आपले नाव कमी करावे.

नाशिकच्या संस्कृतीची ओळख नाशिक ढोल !

कोणत्याही वरातीत नाचताना नाशिक ढोल किंवा कावडीच्या तालावर जो नागीण डान्स, कोंबडी डान्स, पोपट डान्स करू शकतॊ, तोच खरा नाशिककर !!!!

तुम्ही भलेही कोणत्याही कॉलेजात शिकलेले असा पण कॉलेजरोडलाच ज्याने आपले तारुण्य घालविले असेल तर तुम्ही नाशिककर झालेच म्हणून समजा.

पूर्ण राज्यात सर्व ऋतूमध्ये थंड असलेले नाशिक एकमेव असे शहर !

नाशिककर हा इथल्या वातावरणासारखा थंड स्वभावाचा आहे, त्याला मुंबईकरासारखी धावपळ सहन होत नाही, पुणेकरांप्रमाणे किमान शब्दात कमाल अपमान देखील करता येत नाही. तो त्याच्या धुंदीत शांततेत जगात असतो त्यामुळे तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी ‘गड्या ! आपुला गाव बरा’ म्हणायला विसरत नाही.

श्री राम रथ नाशिक !

नाशिककर जेवढा परंपरावादी आहे तेवढाच प्रगतिशील आहे. सुलाची द्राक्षे आणि तपोवनात रुद्राक्षे अशा दोन्ही संस्कृती तो लीलया खांद्यावर पेलू शकतो. रामनवमीला ज्या भक्तिभावाने राम रथाच्या दोरीला हाताला लावतो त्याच भक्तिभावाने सादिकशाह हुसेनी बाबाच्या दर्ग्यावर पण माथा टेकतो.

एखाद्या कर्तबगार अधिकाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो तर गोदावरी वाचवायला पण त्याच निर्धाराने उतरतो.
कदाचित ह्याच कारणामुळे वाल्मिकी रामायणापासून मुघल दरबारापर्यंत सर्वानीच ह्या शहराचे गोडवे गायले आहेत.
नाशिककर त्याच्या शहरावर अपार प्रेम करतो, दिवसभर उनाड वासरासारखं उंडारल्यावर आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला ह्याच गोदामाईच्या कुशीत विसावा घ्यायचाय हीच त्याची इच्छा असते.

जर असं तुम्हालाही करता आलं तर नक्कीच नाशिककर व्हा !!!!!

@सौरभ_रत्नपारखी

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “#तुम्हाला_नाशिककर_व्हायचं_आहे_का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.