#तुम्हाला_नाशिककर_व्हायचं_आहे_का? #भाग_२ सौरभ रत्नपारखी Nashik On Web

#तुम्हाला_नाशिककर_व्हायचं_आहे_का? #भाग_२ सौरभ रत्नपारखी

तुम्हाला नाशिककर व्हायचंय का हा प्रश्न विचारत (पु.लं च्या कृपेने) पहिली पोस्ट लिहिली होती. पण ती पोस्ट लिहून झाल्यावर “गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने” अशी गत झाली. qualities of being nashikkar saurabh ratnaparkhi part 2

गेली हजारो वर्षे इतिहासाचा मूक साक्षीदार असणाऱ्या ह्या ‘अजब” शहराची ‘गजब’ कथा एका पोस्टमध्ये मावणारी नव्हती म्हणून दुसरी लिहिण्याचे धाडस करतोय.

पहिली पोस्ट वाचल्यावर अनेक जण म्हणाले की, ‘नासिक’ शब्दच योग्य आहे पण त्यापैकीच एखादी व्यक्ती गावात फेरफटका मारायला गेली कि ती जुन्या नाशकात चाललोय हेच म्हणते. जुन्या नासकात म्हणत नाही. (अस्सल नाशिककरासाठी ‘गाव” म्हणजे जुने नाशिक आणि ‘रोड’ म्हणजे नाशिकरोड हा समानार्थी शब्द असतो)

असो, हा नावाचा वाद न संपणारा आहे.

नाशिककरांना परिवर्तनाची खूप आवड आहे. ते काळासोबत बदलतात. वाहते पाणी शुद्ध राहते म्हणून प्रवाहाच्या सोबत राहणे हा नाशिककरांचा स्थायीभाव आहे. म्हणूनच एकेकाळी शहराचं पावित्र्य भंग पावेल म्हणून रेल्वेला गावापासून दूर ठेवणाऱ्या नाशिककरांना आता मेट्रोचे वेध लागले आहेत.

काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह अनुभवणारे हे शहर जात-पात न पाहता मतदान करू पाहतंय. म्हणून कोणत्याही मध्यमवर्गीय घराची पार्श्वभूमी असणारा साधा कार्यकर्ता सुद्धा इथे मोठ्या पदावर पोहोचू शकतो. qualities of being nashikkar saurabh ratnaparkhi part 2

छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधणारा नाशिककर स्वभावाने ‘ ग्लोकल’ आहे. म्हणजे मनाने लोकल असला तरी ह्याचे विचार ग्लोबल असतात, म्हणून इथे ‘सिंगापूर गार्डन असू असते, कॅनडा कॉर्नर असू शकतो, तिबेटियन मार्केट असू शकते, हाजी दरबार असू शकतो! चायना टाऊन आणि पिटर इंग्लंड पण असू शकते.

श्रावणी सोमवारला त्र्यंबकच्या फेरीवरून घरी आल्यावर आपले सुजलेले पाय कोमट पाण्यात टाकले की त्याच्या चेहऱ्यावर विश्वपरिक्रमा केल्याचे समाधान दिसून येते. निवृत्तीनाथांच्या पालखीचं दर्शन घेतलं तरी त्याला वारीला जाऊन आल्याचा आनंद मिळतो.

सोमेश्वरचा धबधबा हा त्याच्यासाठी नायगरा असतो आणि खंडोबाची टेकडी माउंट एव्हरेस्ट!

इथे वाचा तुम्हाला नाशिककर व्हायचं_आहे_कापार्ट 1

शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रँड आले तरी पिझ्झा बर्गरपेक्षा कोंडाजी किंवा कऱ्हाडचा चिवडा, विजूची दाबेली, शौकीनची भेळ, कृष्णाईचा वडापाव हेच त्याचे फास्ट फूड असते.

एरवी सर्वाशी जुळवून घेणारा नाशिककर दोन बाबतीत मात्र पुणेकरांशी जाम भांडतो , ते म्हणजे’ ढोल आणि मिसळ !’
साधी एक प्लेट मिसळ खाण्यासाठी तेवढ्याच किमतीचे पेट्रोल खर्चून मखमलाबाद आणि गंगापूरला जाणारा नाशिककर त्याला ‘पुणेरी संस्कृती’ म्हटल्यावर मिसळीतल्या रश्यासारखा लाल होतो. पण मग मनातल्या मनात म्हणतो “जाऊद्या! पाणीपुरीत वरण टाकणाऱ्यांशी काय भांडायचं…”

नाशिककर इथल्या रहाडीसारखा आहे! रंगुनी रंगात साऱ्या म्हटला तरी त्याचा वेगळा रंग ओळखता येतो.

नाशिकची नाळ देशाच्या इतिहासाची जुळलेली आहे.

नाशिकने रावणावर चालून जाणारा जटायू पाहिला,
नहपानाच उच्चाटन करणारा सातवाहन पाहिला,
मुघल सेनेला पाच वर्ष रोखणारा रामशेजचा संग्राम पहिला ,
चिमाजी अप्पांच्या वसई विजयाचे प्रतीक असलेली नारोशंकराची घंटा पाहिली
जॅक्सन वर गोळ्या झाडणारा अनंत कान्हेरे पहिला,
देवळालीची आर्टिलरी आणि ओझरचे एयरफोर्स देशाच्या रक्षणासाठी धावून जाताना पहिल्या.

एवढेच काय पण ‘हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावणे गरजेचे आहे हे ओळखून मा. यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध आमचे खासदार म्हणून दिल्लीत पाठविणारे पण नाशिकचं !

आज नाशिक बदलत आहे. अंबड सातपूर या आपल्या दोन राबत्या हातांनी नवी ओळख बनवू पाहत आहेत. सिडकोने तर कधीच स्वतःला ‘नवीन नाशिक’ ही ओळख मिळवली आहे. नाशिकरोड आता गावाबाहेर वाटतं नाही.

अंगावर कितीही तोळ सोन असले तरी कालिकेच्या आणि भद्रकालीच्या चरणावर आपट्याची पाने वाहिल्याशिवाय ज्याला शिलंगणाचे सोन लुटल्याचा आनंद मिळत नाही त्या नाशिककराच्या सीमा आता विस्तारल्या आहेत.

जिथे स्वतः प्रभू श्रीराम म्हणाले होते की “अयं पंचवटी देश; सौम्य पुष्पितकानन:” तिथे आता स्मार्ट सिटी व्हायचा ध्यास लागलाय.

ह्या सर्वात नाशिकचं नाशिकपण हरवतंय.
सोमवार पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठेतले जुने वाडे जमीनदोस्त होऊन तिथे टोलेजंग इमारती बनत आहेत. एरवी गोदातीरी चक्कर मारून विकेंड साजरा करणारा नाशिककर कधीच नाहीसा झालाय !
बापू ब्रिज, सीसीएम फूडकोर्ट, सीसीडी, असे नवनवे कट्टे त्याला मिळत आहेत.

पण तरीही तो हे बदल ना कुरकुरता स्वीकारतो कारण’ परिवर्तन’ आणि ‘नवनिर्माण’ ह्या दोन्ही गोष्टींची त्याला आवड आहे.

नाशिककर आकाशात झेपावण्याची मोठी स्वप्ने जरूर पाहतो पण तो स्वतःचे घरटे कधीच विसरले नाही.

तो थेम्स किंवा हडसन नदीच्या काठावर जाऊन जरी स्थिरावला तरी पाणावलेल्या डोळ्यांनी सावरकरांप्रमाणे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ हेच म्हणतो ! आणि हेच नाशिककर असल्याचे अंतिम लक्षण आहे.

@सौरभ_रत्नपारखी

इथे वाचा #तुम्हाला_नाशिककर_व्हायचं_आहे_कापार्ट 1

qualities of being nashikkar saurabh ratnaparkhi part 2
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.