अस्वच्छतेमुळे गोदावरी आजारी पडली आहे-मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंह

वृक्षतोड, प्रदूषणामुळे नाशिकचे पर्यावरण बिघडले असून येथील भूमीला ताप आला आहे. अस्वच्छतेमुळे गोदावरी आजारी पडली आहे. पुढच्या पिढीचे भवितव्य निरोगी ठेवण्यासाठी गोदा स्वच्छ ठेवली पाहिजे. पाण्याचे काम हे केवळ सरकारचे नसून समाज आणि संतांसह सर्वांनी त्यासाठी भरीव योगदान दिली पाहिजे. या कामी नमामी गोदा फाऊन्डेशनला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयात केले.

नमामी गोदा फाऊन्डेशनच्या उपक्रमांतर्गत गोदा स्वच्छतेसाठी योगदान देणा-या 34 शाळा-महाविद्यालयांचा सत्कार राजेंद्र सिंह यांच्या हस्ते उपनगर येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, गोदा फाऊन्डेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, अभिनेता चिन्मय उदगीरकर, दंडे ज्वेलर्सचे संचालक मिलिंद दंडे, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, प्राचार्य राम कुलकर्णी, शिरीष दंदणे, सुनील ओढेकर, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, सचिन चव्हाण, जगबीर सिंग, रोहन देशपांडे, मिलींद गांधी, रमाकांत कुलकर्णी, विनोद राठोड, धनंजय धुमाळ, नुपूर सावजी आदी व्यासपीठावर होते.

राजेंद्र सिंह म्हणाले की, गोदामाई प्रदुषणामुळे गंभीर आजारी आहे. ती आयसीयूमध्ये आहे. आपले सर्वांचे आरोग्य गोदामाईशी निगडीत आहे. गोदावरी बारमाही प्रवाही करण्यासाठी गोदा स्वच्छतेचा संकल्प सर्वांनी सोडून भरीव योगदान द्यावे. जेव्हा भारतात नदी, नीर व नारीचा सन्मान होत होता तेव्हा भारत जगाचा गुरु होता. आता नीरची (पाणी) विक्री तर नारी व नदीचा अवमान होत असल्याने भारत मागे पडला आहे. नमामी गोदा फाऊन्डेशनचा उपक्रम त्यामुळे महत्वाचा आहे. त्याला सर्वांनी साथ द्यावी.

रविंद्र सिंघल म्हणाले की, राजेंद्र सिंह यांची जलसेवा आदर्शवत आहे. त्यांना साथ देणे आपले कर्तव्य आहे. गोदावरी स्वच्छ ठेवण्याचे वचन आपण त्यांना देऊया. नदी हे आपले भविष्य आहे. आपण तीचे ताबेदार आहोत. किरण अग्रवाल म्हणाले की, मुलांवर जलसंस्कार करुन पर्यावरणाबाबत जागृती करण्याचे महत्वाचे काम गोदा फाऊन्डेशन करत आहे. मुलेच पर्यावरण संरक्षणाचे काम उत्तम प्रकारे करु शकतील. अभिनेता चिन्मय उदगीरकर म्हणाला की, एकवेळ मी टिव्ही सिरीयल सोडेन पण गोदा स्वच्छतेचे काम सोडणार नाही. गोदेची सेवा हेच माझ्यासाठी आस्कर आहे. धनश्री क्षीरसागर म्हणाला की माझ्या आई इतकेच प्रेम माझे गोदेवर आहे. गोदावरी बरी होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.रविंद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी नदी स्वच्छतेबाबत पथनाट्य व गीत सादर केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.