किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होवू नये : अशी घ्या काळजी

यवतमाळ जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकावर किटकनाशकांची फवारणी करतांना शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा होण्याच्या घटना 6 जुलैपासून सुरुच आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकरी व शेतमजूर यांनी किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

 • किटकनाशकांची फवारणी करताना सर्व शेतकरी व शेतमजूर यांनी प्रतिबंधात्मक किटचा म्हणजेच हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, ॲप्रॉन, बुट इत्यादीचा वापर कटाक्षाने करावा.
 • किटकनाशकांची फवारणी शेतमजूरामार्फत केली जात असतांना शेतमजूरांना संरक्षक किट पुरवून, त्यांना आवश्यक त्या सूचना देण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी शेतमालकाची आहे. त्यानुसार शेतमालकाने नैतिक व कायदेशीर जबाबदारी पूर्ण पाडावी, जेणेकरुन, संभाव्य शारिरीक व जिवित हानी टाळता येईल.
 • शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करतांना स्वत:ला, घरातील कुटुंबियांना अथवा शेतमजूरांना विषबाधा झाल्यास प्रथमोपचार करण्याच्या दृष्टीकोनातून प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध करुन ठेवावे.
 • पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसताना करावी. कारण उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनण्याची प्रक्रिया वेगाने होते.
 • पिकावार किटकनाशकांची फवारणी करताना फवारणी करणाऱ्या व्यक्तीने वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करुन किटकनाशकांची फवारणी केल्यास किटकनाशकाचा फवारा मोठ्या प्रमाणात शरीरावर पडून शरीरात विष भिनण्याची शक्यता असते.
 • पिकावार किटकनाशकांची फवारणी करताना जवळपास अन्य व्यक्ती अथवा जनावरे यांची उपस्थिती असणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी.
 • किटकनाशकांपैकी ऑर्गेनोफॉस्फरस अथवा कार्बामेट अथवा क्लोरीन गटातील किटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस+ सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन, इत्यादी ) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीवेळी आवश्यक ती खबरदारी न चुकता घेण्यात यावी.
 • किटकनाशकांची फवारणी करताना त्यासोबत कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहिती पत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच किटकनाशकांचे पाण्यामध्ये मिश्रण तयार करताना कंपनीने घालून दिलेल्या प्रमाणानुसारच मिश्रण तयार करावे. विहीत प्रमाणापेक्षा पाण्यामध्ये किटकनाशकांची जास्त मात्रा झाल्यास, पिकांना,तसेच, जिवितास धोका वाढतो,ही बाब विचारात घ्यावी.
 • किटकनाशकांची फवारणी करताना शेतमालकाला स्वत:ला विषबाधा झाल्यास त्याने तात्काळ प्रथमोपचार घ्यावेत. तसेच, शेतमजूर अथवा अन्य व्यक्तीस विषबाधा झाल्यास त्याच्यावर तात्काळ प्रथमोपचार करावेत. प्रथमोपचारानंतर स्वत: अथवा संबंधित शेतमजूराला तात्काळ जवळच्या शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात दाखल करुन उपचार घ्यावेत.
 • शेतमालकाने , माणसूकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहिती, कृषी सहाय्यक, पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला, तहसिलदार, पोलीस ठाणे अंमलदार, आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक अथवा जिल्हाधिकारी यांना तात्काळ कळवावी. बाधित व्यक्तीच्या कुटुंबियांनासुद्धा शेतमालकाने अवगत करावे.
 • शेतमालकाने अथवा शेतमजूरांनी विषारी किटकनाशके लहान मुले अथवा जनावरे यांच्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर, शिल्लक राहिलेले किटकनाशक, किटकनाशाचे डबे, पॅकिंग, बॉक्स, इत्यादी मटेरिअल काळजीपर्वूक नष्ट करावे अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
 • किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमालकाने अथवा शेतमजूरांनी फवारणी दरम्यान अथवा फवारणी पूर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ अथवा पिऊ नये. फवारणीनंतर साबणाने स्वच्छ आंघोळ करावी. शेतमजूराला संरक्षक किट व साबण पुरविण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी शेतमालकाची आहे.
 • शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजूराची सरकारी दवाखान्यामार्फत वर्षातून किमान एकदा शारिरीक तपासणी करुन घ्यावी.

            अधिक माहितीसाठी नजिकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी  संपर्क साधावा.

 -संकलन

संजय बोराळकर, नाशिक

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.