नाशिक ग्रामीण विभागात अवघ्या चार दिवसात एक हजार वीजजोडण्या
महावितरणचे विशेष अभियान; गावात जावून जागेवर जोडणी
नाशिकः महावितरणच्या नाशिक ग्रामीण विभागात सध्या नवीन वीज जोडणी देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेतुन गेल्या चार दिवसात एक हजारपेक्षा अधिक लोकांना वीज जोडणी देण्यात आली. विशेष म्हणजे महावितरणचे अभियंते, कर्मचारी गावागावात पोहचून नवीन ग्राहकांना जागेवर वीज जोडणी देत आहेत. विभागातील सर्व ग्राहकांना वीज जोडणी देण्याच्या उद्देश्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर आणि अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे यांनी विभागातील सर्व ग्राहकांना वीज जोडणी देण्याची मोहीम हाती घेतली आहे. विभागातील प्रत्येक गावात असलेली घरे व वीज जोडण्या त्यांच्यातील तफावत लक्षात घेऊन ही मोहीम आखण्यात आली. यातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार ज्यांच्याकडे वीज जोडणी नाही अशा लोकांना वीज जोडणी देण्यासाठी महावितरणचे अभियंते व कर्मचारी संबंधित गावांमध्ये जात आहेत. वीज जोडणीसाठी आवश्यक मीटर, साहित्य सोबत घेऊन शाखा अभियंता व कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात पोहचतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वीज जोडणी नसणाऱ्या लोकांना बोलावून घेण्यात येते व वीज जोडणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येते. जागेवरच कोटेशन भरून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोटेशन भरून घेऊन जागेची व ईतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तातडीने वीज जोडणी देण्यात येत आहे.
०१ ऑगस्टपासून ही मोहीम हाती घेण्यात आली असून गेल्या चारच दिवसात १०४३ लोकांना त्यांच्या गावी जावून जागेवर नवीन वीज जोडणी देण्यात आली. यात सिन्नर तालुक्यातील चास, चापडगाव, चोंडी, पाथरे, वावी, देवपूर, कानकोरी, नांदूर, मानोरी आदींसह परिसरातील गावांचा यात समावेश आहे. सिन्नर उपविभाग एकमध्ये ३५२ तर सिन्नर उपविभाग दोनमध्ये ६९१ जणांना या मोहिमेतून नवीन वीज जोडणी मिळाली. पेठ, सुरगाणा इगतपुरी आदी भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सुरगाणा येथे ११ ऑगस्ट रोजी यासाठी विशेष मेळावा घेण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन अधिकृतपणे वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणनकडून करण्यात येत आहे. उप कार्यकारी अभियंता निलेश रोहणकर, विनायक इंगळे यांच्यासह अभियंते व कर्मचारी या मोहिमेत कार्यरत आहेत.
———–
फोटोओळ – सिन्नर उपविभागातील ग्राहकांना त्यांच्या गावात जाऊन जागेवर वीज जोडणी देताना कार्यकारी अभियंता श्री मनीष ठाकरे. समवेत उपकार्यकारी अभियंता श्री विनायक इंगळे, महावितरणचे कर्मचारी व नवीन ग्राहक.