एनआरएम द्वारे करा एन्ड्युरन्स सायकलिंगला सुरुवात

नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचा उपक्रम

नाशिक : नाशिक मध्ये सायकलिंग संस्कृती रुजत असताना सायकलिंग हा खेळ म्हणून पुढे नेण्याची गरज ओळखून नाशिक सायकलीस्टने नाशिक रँडॉनर्स मायलर्सची म्हणजेच एनआरएम सायकलिंगची हा चा नवीनतम उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातील चौथी एन्ड्युरन्स सायकल राईड शनिवारी (दि.८) रोजी आयोजित करण्यात आली यात ४६ सायकलीस्ट सहभागी झाले. त्यापैकी ४४ सायकलीस्टने ही राईड पूर्ण केली. यात ५ महिला आणि ८ तरुण सायकलीस्टने सहभाग नोंदविला.

सायकलीस्टचा कस बघणाऱ्या व वेळेचे बंधन असणाऱ्या ८० व १२० किमीच्या एन्ड्युरन्स सायकलिंग राईड सायकलिंग खेळाडूंना बीआरएम सारख्या राइड्ससाठी तयार करण्यासाठी एनआरएम उपक्रमात प्रयत्न होणार आहेत. मार्च महिन्याच्या ८० किमीच्या राईडमध्ये तब्बल ९४ सायकलीस्टने सहभाग घेतला होता. यात १९ महिला सायकलीस्टचा समावेश होता.

नाशिककरांसाठी नवीन नसलेल्या नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन कडून नाशिक शहरात सायकलिंग संस्कृती रुजवण्यासाठी मोठ्याप्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. महाजन बंधू आणि भरत, अरुण, गोपीनाथ यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धांत मिळवलेल्या यशानंतर नाशिकमध्ये सायकलिंग हा खेळ प्रकार पुढे नेण्याची गरज असून आदिवासी तसेच शहरी भागातील टॅलेंट शोधण्याची गरज निर्माण झाली. त्यातूनच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांनी अगदी बारकाईने अभ्यास करत एनआरएम सायकलिंग ही नवी संकल्पना सत्यात उतरवण्याचे ठरवले असून त्यांना धीरज छाजेड, विकाश जैन, गणेश पाटील यांची साथ मिळत आहे.

 

काय आहे एनआरएम?

एनआरएम म्हणजेच नाशिक रँडॉनर्स मायलर्स हा कार्यक्रम नाशिकमध्ये डिसेंबर २०१६ पासून अमलात आणण्यात येत आहे. नाशिक शहरात सायकलिंग करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी कोणास १०० किमी सायकलिंग म्हणजे मनात भीती निर्माण होते. ही भीती दूर करण्यासाठी नाशिक सायकलीस्टने एनआरएम ही वेळेचे बंधन असलेल्या ८० व १२० किमी अंतराच्या राईडचा अंतर्भाव असलेली संकल्पना पुढे आणली. पहिल्याप्रथम सेंच्युरी राईडचे आयोजन करण्यात आले. या राईडला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचवेळी सायकलीस्टना एनआरएमची ओळख करवून देण्यात आली. जानेवारी २०१७ मध्ये ८० किमीच्या पहिल्या एनआरएमचे आयोजन करण्यात आले. नाशिक ते पिंपळगाव महामार्गावर घेण्यात आलेल्या या राईडमध्ये ३७ सायकलीस्टने सहभाग घेतला. फेब्रुवारी २०१७ मध्ये २५ सायकलीस्टने १२० किमीची एनआरएम राईड यशस्वीपणे पूर्ण केली. तर मार्च महिन्यातील ८० किमीची एन्ड्युरन्स राईड नाशिक ते वणी अशा एकेरी मार्गावर घेण्यात येऊन सायकलीस्टमधील आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता चौथी एन्ड्युरन्स एनआरएम राईड ८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

एनआरएम मध्ये खेळाडूंनी सातत्य राखावे यासाठी सलग तीन राईड मध्ये सहभागी होणाऱ्या सायकलीस्टला सिल्वर मेडल,सलग सहा राईड साठी गोल्ड तर सलग बारा राइड्स मध्ये सहभागी होणाऱ्या सायकलीस्टला प्लॅटिनम मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.

सकाळी सहा वाजता राईडची सुरुवात करण्यात येऊन ८० किंवा १२० किमीचा वेळ ठरवून देण्यात येतो. या प्रत्येक राईड दरम्यान सायकलिस्टची विशेष काळजी घेण्यात येते. काही अंतरात चेक पॉईंट्स उभारले जातात. फायरफॉक्स सायकल्सने दिलेली लुथ्रा व्हॅन व ऍम्ब्युलन्स सोबत असते. तसेच राईड सुरु होण्याआधी तसेच संपल्यानंतर डॉ. पिंप्रीकर यांच्यातर्फे स्नायूंचा व्यायाम करवून घेतला जातो.

 

संकेतस्थळावर सर्व काही…

एनआरएम सायकलिंगचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी या उपक्रमाचे nrmcycling.com या विशेष बनवलेल्या संकेतस्थळावर खेळाडूंची संपूर्ण ओळख, सहभागी होताना सायकलीस्टसाठीचे नियम एवढेच नाही तर राईडचे तसेच सभासद फी, प्रत्येक राईड साठीचे शुल्कही ऑनलाईन स्वीकारण्यात येते.

 

एनआरएमची संकल्पना

नाशिक रँडॉनर्स मायलर्स हा मॅरेथॉन रनच्या धर्तीवर सुरु झालेल्या बीआरएम म्हणजेच ब्रेव्हेट रँडॉनर्स मायलर्स या लांब अंतराच्या व कमी वेगाच्या सायकलिंगसाठीचा तयारी करण्यासाठी बनविण्यात आलेला कार्यक्रम आहे. लांब अंतराच्या सायकलिंग स्पर्धांची तयारी करण्यासाठी अशा उपक्रमांचा यूरोप व अन्य देशांत ब्रेव्हेट्स  कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. त्या कार्यक्रमाद्वारे सायकलिंग खेळातील विविध लांब अंतराच्या स्पर्धांसाठी तयारी करण्याची संधी अनेकांना मिळाली आणि अनेक स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्या जाऊ लागल्याचे आपण बघत आहोत. याच धर्तीवर अशा स्पर्धा भारतात आयोजित होण्याच्या दूरदृष्टीने एनआरएम सारख्या उपक्रमाचे नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन सायकलीस्ट स्पर्धकांना एक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करत आहे. एनआरएम हा उपक्रम नाशिक रँडॉनर्स मायलर्स याच नावाने देशभर फ्रॅन्चाइसी देवून राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने नाशिकमधून एखादी संकल्पना देशभर पसरावी आणि नाशिकला सायकल कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख निर्माण करवून देण्यासाठी नाशिक सायकलीस्ट फाऊंडेशन नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “एनआरएम द्वारे करा एन्ड्युरन्स सायकलिंगला सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.