निसर्ग चक्री वादळ संकट : आपत्ति व्यवस्थापनासाठी सज्ज रहा; नागरिकांनो या महत्वाच्या सूचना इथे वाचा

जिल्हाधिकारी : सतर्क राहण्याचे आदेश

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे पश्चिम किनार पट्टीवर ४ जून पर्यंत निसर्ग चक्री वादळ धडकण्याची चिन्हे असून त्याचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसू शकतो. ते पाहता जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

चक्री वादळाचा परिणामामुळे मागील दोन दिवस जिल्ह्यातील हवामान ढगाळ झाले आहे. त्यात 2 ते 4 जूनपर्यंत तीव्र अतीवृष्टी, सोसाटयाचा वारा व वादळ, वीज कोसळणे, झाडे कोसळणे, वाहतूक व्यवस्था ठप्प होणे, या संकटाचा सामना करावा लागू शकतो. हा धोका लक्षात घेता नागरिकांचे स्थलांतरण, सुरक्षित निवार्‍याची व्यवस्था, याची तयारी, पर्यायी व्यवस्था करावी. तसेच सध्या कोरोनाचेही संकट आहेच.

त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी रवानगी करताना तो परिसर, ठिकाण निर्जंतुकिकरण करणे, कोव्हीड रुग्णांचे स्थलांतर करताना घ्यावयाची काळजी, अौषध पुरवठा, मास्क व पीपीई किटचा साठा याची सर्व व्यवस्था करावी. रुग्णालयाचा वीज पुरवठा याची खात्री करावी. तसेच केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास सादर करावा.

हे करताना आपत्ती व्यवस्थापनाची पथके,स्थानिक कार्यकारी यंत्रणेची सुरक्षा दले व मदत कार्य याची व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. याबाबत मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगर पालिका व नगर पंचायत यांना पत्राद्वारे सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नाशिककरांनो या सूचना पाळा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक

निसर्ग चक्री वादळ या संकटाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

IMD (Indian Meteorological Department) हवामान विभागाच्या अंदाजानुसार “निसर्ग” चक्रीवादळ मंगळवार आणि बुधवारी 2 ते 3 जून रात्री महाराष्ट्रावर धडकणार आहे.

दिनांक 01 ते 04 जुन 2020 या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील काही भागात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कालावधीत वाऱ्याचा वेग जास्त राहील तसेच मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे.
तरी सर्व नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घेण्याबाबतचे आवाहन श्री सुरेश मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक यांनी केले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात Home Quarantine असलेले नागरीक यांच्यासाठी सुरक्षित स्थळे निश्चित करावी व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर त्यांना सुरक्षीतस्थळी हलविण्याबाबत नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, स्थलांतरीत ठिकाणी विना मास्क फिरू नये, सॅनिटायझरचा वापर करावा.

1.दिनांक 03 व 4 जुन 2020 रोजी अतिवृष्टीमुळे घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.

2. घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी व सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे.

3. घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे.

4. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे.

5. आपले जवळ केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु आपल्या सोबत ठेवाव्यात.

6. हवामान खात्याकडून मिळणारे इशारे व माहितीसाठी जवळ रेडीओ बाळगावा. व त्याद्वारे माहिती घ्यावी.

7. सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.

8. बाल्कनी मधील हँगिंग किंवा लाइट मटेरियल उदा.फुलांची भांडी, कुंड्या व इतर जड साहित्य तात्काळ सुरक्षित कराव्यात.

9. काचेच्या खिडक्या ढिल्या असतील तर तात्काळ दुरुस्त करा तसेच दाराच्या पॅनेलची तपासणी करुन ती दुरुस्त करा.

10. वाहनावर झाडे व इतर साहित्य पडू नये यासाठी वाहने सुरक्षित करा. दुचाकी मुख्य स्टँडवर उभी करा.

11. प्रथोमोचार किट, बॅटरी, पॉवर बँक चार्जिंग करून ठेवा. जखमांसाठी आवश्यक औषधे व आजारी रुग्णाची औषधे सुरक्षित रुग्णाच्या बेड जवळ ठेवा.

12. विद्युत वाहक तारा तुटल्याने व ट्रान्सफार्मर खराब झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी. जनरेटर साठी इंधनाचा पुरवठा असावा.

13. वॉटर प्युरिफायरमध्ये विजेचे नुकसान झाल्यास पुरेसे पिण्याचे पाणी साठा करून ठेवा.

14. शुजरॅक चांगल्या प्रकारे बोल्ट कराव्यात, सर्व शूज व इतर वस्तू चांगल्या प्रकारे एकत्र करून सुरक्षित केल्या पाहिजेत.

15. डिश टीव्ही व्यवस्थित घट्ट किंवा पक्के करा.

16. एअर-कंडिशनर बाह्य युनिट्स पक्के करून घ्या .

17. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

18. विनाकारण घराबाहेर पडू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका.

19. झाडाखाली उभे राहू नका.व झाडाखाली वाहने लावू नका.

20. पत्र्याच्या शेड खाली उभे राहू नका.

अधिक माहिती साठी व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक संपर्क क्रमांक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा.
‘सजग नागरिक सुरक्षित नागरिक’

जनहितार्थ प्रसिद्ध

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.