पेडलच्या सायकल शेअरिंग उपक्रमाचे उद्घाटन

प्राथमिक पातळीवर सहा सायकल्स उपलब्ध

नाशिक : नाशिक महानगर पालिका आणि टीसीएसच्या डिजिटल इंपॅक्ट स्क्वेअर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायकल शेअरिंग या उपक्रमाचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात आलेल्या प्रथम केंद्रात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. शहरातील हवा प्रदूषण, व्यायामासाठी सायकल आणि इच्छित स्थळी जाण्यासाठी सायकलचा वापर वाढवा यासाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, नगरसेविका हेमलता पाटील, महापालिकेचे प्रभारी मुख्य अभियंता यु. बी. पवार आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर रंजना भानसी म्हणाल्या की, नाशिक महानगरपालिका असे प्रकल्प राबविण्यासाठी उत्सुक असून विविध ठिकाणी या उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यील. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्वतंत्र सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यास महानगरपालिका सकारात्मक आहे. प्रथम प्रयोगात हा उपक्रम यशस्वी झाल्यास पेडल टीम आणि नाशिक सायकलीस्ट यांनी केलेल्या विविध सर्वेचा अभ्यास करून शहरातील इतर भागातही याचे प्रयोजन करण्यात येणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले आहे.

स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बोस्टन (अमेरिका) शहराच्या धर्तीवर प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चेन्नई स्थित एसआरएम युनिवर्सिटीच्या अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधक टीमने ही संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न केला असून गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून त्यांनी या प्रकल्पाची तयारी चालविली आहे. यात पेडल कॅम्प मध्ये ठेवण्यात आलेल्या स्वॅपिंग यंत्रात आपले सदस्यत्व असलेले स्मार्ट कार्ड स्वाईप केल्यानंतर सायकल वापरता येणार आहे. सायकलचा वापर संपल्यानंतर त्याचठिकाणी सायकल लॉक करून ठेवता येणार आहे. केवळ १५ पैसे प्रती मिनिट एवढ्या नाममात्र दरात सायकल वापरण्यासाठी उपलब्ध असल्याचे टीसीएसच्या डिजिटल इंपॅक्ट एसक्यूच्या सामाजिक उपक्रमांचे प्रमुख संदीप शिंदे सांगितले आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येक सायकल मागे ४० हजार एवढा खर्च झाला असून अधिकाधिक सुविधा पुरविणे आणि चांगली सेवा यासाठी प्रकल्पाचा विस्तार करताना प्रायोजकांची गरज लागणार आहे. नाशिक सायकलीस्टचे सहकार्य घेऊन या सेवेमध्ये उच्चतम सुविधांचा समावेश करण्यात येणार असून नाशिकमधील लोकांपर्यंत पोहचण्यासाठीही नाशिक सायकलीस्टचे सहकार्य मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पेडल टीम ही गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून या प्रकल्पावर काम करत असून विविध सर्वे केल्यानंतर गोल्फ क्लब मैदानावर पहिले केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्घाटनावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नाशिक सायकलीस्टने यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील कोणत्या भागात सायकल ट्रॅक उभारण्यात यावेत याचे मार्गदर्शन तसेच सायकल वापरण्यास नागरिकांना उद्युक्त करणे, उपक्रम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवणे, वापरकर्त्यांना सायकल वापरताना येणाऱ्या अडचणी सोडविणे यासाठी नाशिक सायकलीस्ट या संशोधक टीमला मदत करणार असल्याचे नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांनी सांगितले. सदस्य होण्यासाठीची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठीही नाशिक सायकलीस्टकडे उपलब्ध असलेल्या स्रोतांची मदत होणार आहे.

असा असेल उपक्रम :

  • प्रायोगिक तत्त्वावर सहा सायकल्स उपलब्ध
  • हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सायकल उपलब्ध असतील.
  • ‘टीआय’ कंपनीनतर्फे सहा सायकल्स.
  • सायकलचा वापर करण्यापूर्वी आधारकार्डद्वारे नोंदणी आवश्यक.
  • नोंदणी केलेल्या सदस्यांना डेबिट कार्डच्या धर्तीवर स्मार्टकार्ड दिले जाईल.
  • कार्ड स्वाईप केल्यानंतर सायकलचा वापर करता येणार आहे.
  • १५ पैसे प्रती मिनिट अशा नाममात्र शुल्कात सायकल्स उपलब्ध.
  • सायकल्स जीपीएस प्रणालीशी जोडलेल्या असणार.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “पेडलच्या सायकल शेअरिंग उपक्रमाचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.