गोदामाईच्या साक्षीने : वीरमाता, वीरपत्नी, वीर पुत्रीचा निनाद यांना अखेरचा निरोप !

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना शुक्रवारी गोदामाईच्या साक्षीने वीरमाता, वीरपत्नी, वीर पुत्रीने शोकाकुल वातवरणात अखेरचा निरोप दिला  आहे. लष्करी इतमामात निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय वायुदलाने मांडवगणे यांना मानवंदना दिली. शहीद जवानाच्या दर्शनासाठी देशभक्तांचा जनसागर उसळला होता. पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गीते यावेळी उपस्थित होते.‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘शहीद निनाद अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

शहीद निनाद यांना अखेरचा निरोप देतांना त्यांची चिमुकली !

शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शहीद निनाद यांची पत्नी त्यांच्या चिमुकलीला घेऊन दाखल झाल्या तेव्हा वातावरण अगदी भावूक झाले,  चिमुकलीने आपल्या बाबांना अखेरचा निरोप दिला. यावेळी उपस्थितांना गहिवरून आले होते आणि अनेकांचे डोळे पाणावले होते.

सकाळी ८.३० डिजीपी नगर येथे निनाद याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणले.  यावेळी निनाद चे नाते वाईक, परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. गुरुवारी रात्री 9.30 वाजता ओझरला आणल्यानंतर प्रथम एअरफोर्सच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. एअरफोर्स स्टेशन येथे पार्थिव रात्रभर ठेवण्यात आले आणि  शुक्रवारी दि.1 मार्च रोजी  सकाळी 8.30 वाजता ते कुटुंबीयांना सोपविण्यात आले. अर्धा तास कुटुंबीयांसाठी दिल्यानंतर जवळच असलेल्या के. के. वाघ शाळेजवळील मैदानावर सकाळी नऊ ते साडेनऊ या वेळेत ते नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते . नंतर  फेम थिएटरमार्गे अंत्ययात्रा द्वारका सर्कलहून अमरधामकडे अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

पालकमंत्री गिरीश महाजन तसेच लोकप्रतिनिधी, ओझर स्टेशनचे एअर कमाडोर समीर बोराडे, देवळाली एअर फोर्स स्टेशनचे कमाडोर पी रमेश तसेच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनीही अमरधाम येथे निनाद यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. लष्करी धून तसेच हवेत फैरी झाडून निनाद यांना मानवंदना देण्यात आली. निनाद यांच्या कटुंबियांनी अंत्यसंस्कार केले आहेत.

यावेळी निनाद यांच्या चिमुकलीला पाहून सर्वाना गहिवरून आले होते. यावेळी  निनाद यांची पत्नी, आई आणि इतर सर्व नातेवाईक हजर होते. यावेळी गोदामाईच्या साक्षीने सर्वांनी शहीद निनाद यांना अखेरचा निरोप दिला आहे.  शहीद पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे  त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे.निनादचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून आईही सेवेतून सेवानिवृत्त झाली आहे. निनाद हा त्यांचा मोठा मुलगा असून लहान मुलगा जर्मनीत सी. ए. पदावर सेवेत आहे.

निनादचे शिक्षण (पाचवी ते दहावीपर्यंत) भोसला मिलिटरी मध्ये तर ११ वी आणि १२ वीचे चे शिक्षण औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झाले होते. नंतर त्याने बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशन मध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर २००९ ला एअर फोर्स मध्ये स्कॉड्रन लीडर पदावर सेवेत रुजू होऊन गुवाहाटी, गोरखपूर येथे सेवा करून एक महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे बदली झाली होती.

जम्मूच्या बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी भारतीय हवाई दलाचे ‘एमआय-17 व्ही 5’ बनावटीचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत दोन पायलटसह सहा जण शहीद झाले. त्यात मूळचे नाशिकचे असलेले पायलट निनाद मांडवगणे यांचाही समावेश होता.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.