मुंढेंच्या बदलीस पालकमंत्री महाजन यांचे बळ: अंजली दमानिया यांचा आरोप

शेकडोंच्या संख्येने नाशिककर रस्त्यावर; नर्मदा बचाव आंदोलनाचा पाठींबा; जनहित याचिका दाखल करणार

नाशिक : कर्त्यवदक्ष आयुक्त तुकाराम मुंढे हे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला नकोसे झाले होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांना देखील ते डोईजड ठरत होते. त्यामुळेच कटकारस्थान रचून मुंढे यांना हटविण्यात आले. मुंढे यांच्या बदलीमागे सर्वपक्षीय १२७ नगरसेवक, नाशिक शहराचे 3 आमदार तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. तसेच मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी नाशिककरांनी उभारलेल्या लढ्याचे त्यांनी समर्थन केले. या लढ्याला नर्मदा आंदोलनाच्या मेधा पाटकर तसेच विश्वंभर चौधरी यांनीही पाठींबा दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. nashik wants mundhe long march amhi nashikkar anjali damania

याप्रकरणी नाशिककरांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी त्यासाठी ड्राफ्ट तयार करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी देत आम्ही नाशिककरांच्या लढ्यास बळ दिले आहे. आम्ही नाशिककर तर्फे मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी लढा उभारला आहे. याला समर्थन देण्यासाठी अंजली दमानिया आज गुरवारी नाशिकमध्ये आल्या होत्या. यावेळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते सीबीएस येथील डॉ. आंबेडकर पुतळा असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी दमानिया यांनी मनपा सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांवर तोफ डागली.

विकासाच्या मुद्यावर कधीही एकत्र न येणारे पक्ष मुंढे यांच्या बदलीसाठी एकत्र येतात यातच सर्वकाही आले. मुंढे यांच्यामुळे नगरसेवकांचे टक्केवारीचे गणित बिघडले होते. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या पैशाची गरज आहे मात्र मुंढे या मार्गात मोठा अडथळा होते. यांना आपल्या मागेपुढे हाजीहाजी करणारे अधिकारी हवे असतात. त्यामुळेच आयुक्तपदावरून बदली करत मुंढेंची आडकाठी दूर करण्यात आली असा घणाघात त्यांनी केला. नाशिककरांच्या लढ्याला माझा पाठींबा असून जनहित याचिकेसाठी जी काही कायदेशीर मदत करता येईल ती मी करेन असे आश्वासन दमानिया यांनी दिले. मुंढे लोकांना हवे आहेत मात्र लोकप्रतिनिधींना नकोसे झाले. मग यांना लोकप्रतिनिधी कसे म्हणायचे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सामाजिक कार्यकर्ता समाधान भारतीय म्हणाले की तुकाराम मुंढे यांनी पालिकेचा कारभार सांभाळताना घरपट्टी आणि शेती करात केलेली वाढ वगळता अनेक धाडसी निर्णय घेतले. अधिकाऱ्यांवर कारवाई केली. महापालिका कर्मचाऱ्यांत शिस्त आणली. नियमबाह्य बांधकामांवर कारवाई केली. गरज उपयुक्तता आणि निधीची उपलब्धता या त्रीसुत्रीतून कामे करत त्यांनी महापालिकेचे ४०० कोटींहून आशिक बचत केल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे असंतुष्ट ठेकेदारांचा दबाव आणि अन्य कारणांमुळे मुंढेंची बदली करण्यात आली. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली रद्द करत पूर्ण 3 वर्ष कार्यकाळासाठी त्यांची नियुक्ती पुन्हा करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इथे बघा काय म्हणाल्या अंजली दमानिया :

यावेळी आम्हाला मुंढेच हवेत, मुंढे हटणार नाहीत, मुढेंच्या बदलीचे नेमके कारण सांगा अशा उद्घोषणानी परिसर दणाणून गेला. त्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले. nashik wants mundhe long march amhi nashikkar anjali damania

#NashikWantsMundhe या हॅशटॅगने समाज माध्यमात या मोर्चाबाबत जनजागृती करण्यात आल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत सुनील आव्हाड, निशिकांत पगारे, सचिन मालेगावकर, जितेंद्र भावे, दत्तू बोडके, अनिल भडांगे, समाधान भारतीय, स्वप्नील घिया, राजेंद्र अहिरराव, श्याम गोसावी, विश्वास वाघ, योगेश कापसे, समीर भडांगे, समाधान पगारे, सीमा जत्ते, नितीन गवळी, प्रल्हाद मुर्तडक, अमोल अडांगळे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने नाशिककर रस्त्यावर उतरले होते.

nashik wants mundhe long march amhi nashikkar anjali damania
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.