आंनदवली गावातील रहिवासी रमेश वाळू मंडलिक (वय ७५) यांचा गळा चिरून खून झाल्याची घटना आज बुधवारी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी सूत्रांकडून माहिती मिळाली. गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीजवळील आंनदवली पोलिस चौकी बाजूला असलेल्या इमारती जवळ हा प्रकार घडला आहे.nashik murder
गंगापुररोडवरील आनंदवली गावाच्या शिवारात राहणारे रमेश मंडलिक (७५) या वृध्दाचा संशयितांनी धारधार शस्त्राने गळा चिरल्याने मंडलिक हे जागीच ठार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गंगापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तत्काळ श्वान पथकासह न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मंडलिक यांच्या मारेकऱ्यांच्या शोधात त्वरित गंगापुर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखेचे पथकाला रवाना करण्यात आले.
दरम्यान, नाशिक शहरात मागील दीड महिन्यात ही खुनाची आठवी घटना घडली आहे.
पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापुर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या.
गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत दीड महिन्यांत हा दुसरा खुन आहे. यापुर्वीही आनंदवली शिवारात मद्यपी मित्रांमध्ये वाद होऊन एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात दगड टाकून त्यास जागीच ठार केले होते.nashik murder