नाशिक महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या भाजपाने आता नाशिक महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या असून येत्या दोन दिवसात महापौर पदाचा उमेदवार ठरवला जाणार आहे अशी माहिती शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. मात्र असे जरी असले तरी आता पक्षात निवडणुकीसाठी आलेल्याना संधी मिळते की मुळ भाजपात असलेल्यांना हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
नाशिकचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी असून, त्यात भाजपकडे ५ उमेदवार आहेत. रंजना भानसी, सुरेश खेताळे, पुंडलीख खाडे, प्रा. सरीता सोनवणे, रुपाली निकुळे असे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात रंजना भानसी या ज्येष्ठ नगरसेवक असल्याने त्यांचा दावा असला तरी पक्षात अन्यही उमेदवार आहेत. यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सुकाणू समितीची बैठक होईल आणि त्यात महापौर तसेच उपमहापौर पदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळा सानप यांनी सांगितले.