गंगापूर धरणातून पाण्याचा विक्रमी विसर्ग सुरु दुतोंड्या मारूती बुडाला

नाशिकमध्ये पावसाची संततधार नदीकाठाला सतर्कतेचा इशारा

नाशिक शहर आणि ग्रामीण परिसरात पावसाची  पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सदरच्या भागातील प्रमुख असलेले गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आले आहे. यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून पुराचे पारंपारिक पूर मापक असलेली दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. पूराचे पाणी येथील कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत आले आहे. त्यामुळे सरदार चौकापासून पुढे गोदाकाठालगतचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गोदाकाठावरील जवळपास सर्वच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. प्रशासनाकडून गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच दारणा धरणातून १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर, नांदुरमध्यमेश्वर धरणातून ४७ हजार ७३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.  सदरच्या धरणातून सोडण्यात आलेले हे पाणी पुढे जायकवाडी धरणात जात आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण जरी कमी असले, तरी नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या या  पाण्यामुळे मराठवाड्याचा पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात त्र्यंबकेश्वर येथे १७१मिमी, इगतपुरी ४० मिमी,  नाशिक २१.१ मिमी यांच्यासह जिल्ह्यात एकूण ४१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  

जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी,पेठ या तालुक्यांमध्ये रात्री पासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गंगापूर धरणात त्र्यंबक, अंबोली या पाणलोटक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे सकाळी  अकरा वाजेपासून गोदावरी नदीपात्राचे पाणी वाढले. दुपारी दोन वाजेपर्यंत दुतोंड्याच्या डोक्याला पूराचे पाणी लागले. गोदावरी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी घारपूरे घाट पूल, अहल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूलावर नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी केली.  गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा, चांदोरी या भागातदेखील गोदावरीची पातळी वाढली असून सायखेड्याच्या धोकादायक पुलाला पूराचे पाणी लागले आहे.

दुसरीकडे गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्याने गोदाकाठावरील रहिवाशांसह विक्रेतेही सतर्क झाले आहेत. गोदाकाठाच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे दहा जवानांचे रेस्क्यू पथक गस्तीवर असून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. 

सर्व नदीकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की, खालील प्रमाणे धरणातून विसर्ग सुरू आहे.

गंगापूर 17748 क्यूसेस , गौतमी गोदावरी 6225 क्यूसेस ,आनंदी 687 क्यूसेस ,दारणा 23192 क्यूसेस , भावली 1509 क्यूसेस,वालदेवी 502 क्यूसेस, नांदूर मधमेश्वर 83773 क्यूसेस,पालखेड 6068 क्यूसे, चनकापूर 7307 क्यूसेस, पुनद 2895 क्यूसेस, हरणबरी 56 क्यूसेस, होळकर पूल 20375 क्यूसेस ( धोका पातळी)वरील प्रमाणे विसर्ग सुरू आहे.

सर्व नागरिकांनी सतर्क रहावे व परिसरात पुराचे पाणी शिरत असल्यास तात्काळ स्थलांतरित व्हावे व नदीकाठी , पुलावर गर्दी करू नये तसेच पूर बघण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.सूरज मांढरे भाप्रसेजिल्हाधिकारी नाशिक

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “गंगापूर धरणातून पाण्याचा विक्रमी विसर्ग सुरु दुतोंड्या मारूती बुडाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.