उत्सहात गणेश विसर्जन नाशिककरांचा मूर्तीदानाला चांगला प्रतिसाद

उत्सहात गणेश विसर्जन नाशिककरांचा मूर्तीदानाला चांगला  प्रतिसाद

नाशिक : प्रतिनिधी

पुण्यापाठोपाठ आता नाशिककरांनीही इकोफ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गोदावरी प्रदुषित होऊ नये म्हणून नाशिककरांनी मूर्तीदानाला चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी तसेच, गोदावरीला प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी  सामाजिक संघटनांनी मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला  नाशिककरांनी भरभरुन प्रतिसाद देत मूर्ती दान केले. मूर्तीदान उपक्रमाअंतर्गत नाशिक महापालिकेकडून दुपारपर्यंत ७०  हजार गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. अनेक भाविक स्वत:हून मूर्तीदान करत असल्याचे पर्यावरणीय चित्र आज नाशिक शहरात पाहण्यास मिळाले.

 नाशिक शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या गणेशविसर्जनादरम्यान अनेकांनी गणेशभक्तीसोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्याकडेही लक्ष पुरविले. परिणामी गोदाघाटावर महापालिका आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मूर्ती दान उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

रामकुंड, गाडगेबाबा पुलाखालील पटांगण तसेच सोमेश्वर परिसरात मूर्ती दान करण्यात आल्या. तसेच निर्माल्यही दान करण्यात आले. महापालिकेने त्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे.

अशोका मार्ग, उपनगर परिसरात मूर्ती दान करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची सोय करण्यात आली होती. त्यांनी घरोघरी जाऊन मूर्तीदान घेतले.

सकाळी अकरा वाजेपासून घरातील बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली. सकाळ पासूनच पावसानेही हजेरी लावली होती. त्यामुळे पावसाच्या सरीच्या सोबतच बाप्पाचे विसर्जन झाले.

शहरातील पहिल्या मानाची गणेश विसर्जन मिरवणूक नाशिक महानगरपालिकेच्या गणपतीपासून सुरुवात झाली. दुपारी  सव्वादोन वाजेच्या सुमारास जुन्या नाशिकमधील वाकडी बारव येथून सुरुवात झाली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, आमदार बाळासाहेब सानप, मनपा नगरसेवक, अनेक मंडळांचे पदाधिकारी, नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल सपत्नीक उपस्थित होते. यावेळी नाशिकची ओळख असलेल्या नाशिक ढोल सोबत गुलालवाडी लेझीम पथकाकडून परंपरेप्रमाणे सलामी देण्यात आली.

PHOTO

नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीतील काही क्षण

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.