सिन्नर तालुक्यातील संजीवनी नगरमध्ये प्रेयसीचा गळा दाबून खून करत पळून गेलेल्या परप्रांतीय संशयिताला सिन्नर पोलिसांनी तब्बल दोन महिन्यांनी पकडले आहे. आरोपी दर्वेश गेंदालाल चौरे (वय ३०), रा. चौला मंदिर, भोपाळ असे संशयिताचे नाव आहे. सिन्नर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.(Murder Case)
या गंभीर प्रकरणात सिन्नर येथील सरदवाडी रोड परिसरातील संजीवनीनगर मधील गिरीश शिरसाठ यांच्या घरात परप्रांतीय दर्वेश चौरे, त्याची प्रेयसी रेखा व तिची नऊ वर्षांची मुलगी रिया यांच्यासह भाडेकरू म्हणून राहत होते. दि. २० सप्टेंबर २०१९ रोजी दर्वेश चौरे याने मुलगी घरात नसताना प्रेयसी रेखाचा ओढणीने गळा आवळून खून केला होता. हे सर्व करत त्याने राहत्या घराला कुलूप लावले आणि पळून गेला होता.
याबाबत सिन्नर पोलिसांनी त्यावेळी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र रेखाचा खून करून दर्वेश चौरे याने मध्य प्रदेशतील त्याच्या मूळ गावी लपला होता. मध्यप्रदेशातील हर्दा जिल्ह्यात एका गुन्ह्यात स्थानिक पोलिसांनी अटक करून त्याला मध्यवर्ती कारागृहात पाठविले, तेथेच दर्वेशने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
दर्वेशबाबत सिन्नर पोलिसांना माहिती समजताच मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क करत, त्याचा ताबा मागितला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. रसेडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, नवनाथ चकोर, पी. सी. गोडे, प्रवीण गुंजाळ यांनी संशियताचा ताबा घेतला आणि न्यायालयात हजर केले आहे.(Murder Case)