जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर शूरवीरांच्या बलिदानाचे स्मृतीस्तंभ उभारा : शिवकार्य गडकोट

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केली मागणी

नाशिक १७.७.१७ : नाशिक जिल्हयाला लाभलेल्या सह्याद्री, सातपुडा, सातमाळा पर्वतरांगेत ६० हून अधिक उतुंग ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक संदर्भाचा विसर झाल्याने नाशिक जिल्ह्यातील गडकोटांच्या अस्तित्वासाठी झालेल्या अजिंक्य अशा या लढायांमध्ये धारातीर्थी पडलेल्या शूरवीरांचे पराक्रम व शूरवीरांचे बलिदाने इतिहासाने गौरविले मात्र ज्या ठिकाणी हे प्रसंग घडले त्या-त्या गडकिल्ल्यांवर, परिसरात या इतिहासाच्या पराक्रमाच्या, शूरवीरांच्या बलिदानाचे स्मारक, समाध्या, स्मृतीस्तंभ उभारावे या मागणीचे निवेदन शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे मार्फत १२ जुलै देण्यात आले.

shivkarya gadkot sanvardhan sanstha शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

२०१२ पासून गडकोट संवर्धनाचे काम करीत असलेल्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने आजपर्यंत ४९ दुर्गसंवर्धन मोहिमा नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर झाल्या आहेत. मोहिमेत विविध क्षेत्रातील अभ्यासक आहेत. तसेच राज्यभरात झालेल्या दुर्गसंवर्धन कार्यशाळा, अभ्यास वर्गात मोहिम सहभागी होवून तो अभ्यास गडसंवर्धन कार्यात कामी येतो. या मोहिमांत आलेल्या अनुभवानुसार व अभ्यासानुसार नाशिकच्या गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत दयनीय, दुर्लक्षित असल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे.

या कामी स्थानिक प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधी उदासीन असल्याची स्थिती आहे. आजपर्यंत शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्व, वन, पर्यटन विभाग सामाजिक पातळीवर गडकिल्ल्यांची नेहमी उपेक्षा झाली आहे. या दुर्लक्षित गडकिल्ल्यांची झालेली आत्यंतिक दुरवस्था बघता या किल्ल्यांवरील ऐतिहासिक वारसा नष्ट होत आहे. या कामी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था राज्य शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीला सतत पत्र व्यवहार करीत आहे.

नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर आणि परिसरात झालेले हेच ते लढे : येथे व्हावीत स्मृतीस्थळे :

  • नाशिक पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या किल्ले रामशेजवर शंभूमहाराजांच्या काळात ६ वर्षे झालेल्या अजिंक्य लढा.
  • सातमाळा पर्वत रांगेत किल्ले कांचन मंचनला लागून असलेल्या कांचनबारीत सुरतेहून परतत असताना छत्रपती शिवराय व दाउदखान या मोघली सैन्यात झालेली घमासान लढाई.
  • सातमाळा पर्वत रांगेत असलेल्या किल्ले कन्हेरा गडाच्या अजिंक्य लढ्यात शिवकालीन किल्लेदार रामजी पांगेरा या शूराने अवघ्या ७००  मावळ्यांसह  दिलेरखानच्या हजारोंच्या फौजेला पहाटेच्या प्रहरात दिलेली निकराची झुंज. या लढाईत रामजी पांगेरा धारातीर्थी पडल्याचे संदर्भ इतिहासात क्वचित आढळतात.
  • बागलाण प्रांतातील किल्ले साल्हेरच्या भूमीत शिवकालीन किल्लेदार सूर्यराव काकडेनी औरंजेबाच्या मुघली फौजांशी ६ महिने दिलेला निकराचा लढा इतिहासाला ज्ञात आहे. या लढ्यात तोफेचा छर्रा लागून किल्लेदार सूर्यराव धारातीर्थी पडले.
  • दिंडोरी जवळ असलेल्या रनतळ या ऐतिहासिक भागात सुरतेहून परतत असताना मुघली फौजेबरोबर झालेली लढाई.
  • किल्ले हातगडचे शिवकालीन किल्लेदार गंगाजी उर्फ गोबाजी बाबा मोरे देशमुख यांची हातगड गावातील समाधीची दुरवस्था झाली आहे. या समाधीला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. हातगड पायथ्याशी शत्रूबरोबर झालेल्या लढाईत गंगाजी मोरे देशमुख या ठिकाणी धारातीर्थी पडले. त्यांच्या बलिदानाचा चिरा आज दुरवस्थेत आहे.
  • किल्ले विश्रामगड (पट्टागड) च्या पायथ्याला शिवकालीन सरदार सिदोजीराजे निंबाळकर व परांजपे यांची समाधी किल्ल्याच्या पायथ्याला आहे. मात्र ती मोडकळीस दुर्लक्षित अवस्थेत आहे.

नाशिक जिल्ह्यात बलिदान दिलेल्या किल्लेदारांचे वंशजांचा शोध घेतला जात नाही. ते आज हलाखीत जीवन जगतात वस्तुस्थिती आहे. या ऐतिहासिक अजिंक्य लढ्यांचा इतिहास, त्याच्या खुणा, स्मृती समाजासमोर आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष घालावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांना करण्यात आले आहे.

shivkarya gadkot sanvardhan sanstha nashik district logo

या शूरवीरांच्या स्मृती स्मारकाची कामे तातडीने करावी अशी मागणीही निवेदनात शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, निमंत्रक प्रा. सोमनाथ मुठाळ, मानद सल्लागार संदीप भानोसे, आर आर कुलकर्णी, कृष्णचंद्र विसपुते उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.