नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बाल साहित्य मेळावा होणार आहे. याआधी संमेलनात पहिले वर्ष वगळता ९३ वर्षात पहिल्यांदाच बाल साहित्य मेळावा होणार आहे. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी आणि मेळाव्यात बालकांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजकांकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शहरातील शिक्षण संस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांकडून केले जात आहेत.marathi Sahitya Sammelan
या बाल मेळाव्यासाठी नाशिकचे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे संचालक प्रतिनिधी यांची बैठक झाली. बैठकीस नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी मार्गदर्शन करतांना साहित्य संमेलनात बाल मेळावा आयोजनाचा मान वि. वा. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला असून ही नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. शिक्षण आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. शिक्षण संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांवर साहित्यिक संस्कार व्हावेत यासाठी, तसेच त्यांच्या साहित्यिक गुणांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी संमेलनातील बाल मेळाव्याला सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन उपासनी यांनी केले.
संमेलनाचे निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी बोलतांना प्रत्येक संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त संख्येने बाल साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जातेगावकर यांनी केले. माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी वैशाली झनकर-वीर यांनी शैक्षणिक संस्था आणि शाळा ज्याप्रमाणे शैक्षणिक सहलींचे आयोजन करतात, त्याप्रमाणे त्यांनी नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनाला भेट देण्याचा उपक्रम राबविण्याची सूचना के ली. अशा उपक्रमामुळे उद्याचे साहित्यिक घडण्याचे बीज रोवले जाईल. नाशिक मनपा हद्दीतील शाळा, तसेच तालुक्यातील शाळांनी दिवस निवडून आपल्या निवडक शिक्षक, विद्यार्थ्यांना संमेलनाला पाठविले तर संमेलन सर्वसमावेशक आणि लाभदायी होईल असेही त्यांनी सांगितले.marathi Sahitya Sammelan