विकास प्रक्रीयेला गती देण्यासाठी महापालीकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्री

नाशिक शहरातील विकास प्रक्रीयेला गती देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा,  असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नाशिक महानगरपालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, संभाजी मोरुसकर, लक्ष्मण सावजी,  आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक वाहतूक या चार मूलभूत बाबींवर महापालिकेने लक्ष केंद्रीत करावे. ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण आणि त्यावर प्रक्रीया करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या संदर्भात विद्यामान क्षमता वाढविण्याचा महापालिकेने प्रयत्न करावा.सार्वजनिक वाहतूकीसाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करून ‘ॲपबेस’ बससेवा सुरू करण्याचा विचार करावा. त्यासाठी आवश्यक असल्यास शासनातर्फे जमीन विनामूल्य देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात शहर बससेवा सुरळीत झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात मेट्रोचा विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.

शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देताना फडणवीस म्हणाले, महापालिकेचे अस्तित्वात असलेले उत्पन्नाचे स्त्रोत आणि वाढविता येण्यासारखे स्त्रोत वगळता विकासाचे नियोजन करण्यासाठी कमी पडणाऱ्या निधीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. महापालिकेची तांत्रिक पदे भरण्यासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, गोदावरी संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तज्ज्ञ संस्थांची मदत घेण्यात यावी. महापालिकेला विकासावर अधिक खर्च करणे शक्य व्हावे यासाठी आऊटसोर्सिंग आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा.  महापालिकेने  माहिती तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग सुरू केला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहर विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे, राज्य शासनाशी संबधीत विषयांच्या बाबतीत महापालिकेस सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी आयुक्त कृष्णा यांनी सादरीकरणाद्वारे शहरातील विकास योजना आणि समस्यांची माहिती दिली.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.