सिन्नर फाटा येथील हॉटेल कामगार हत्या प्रकरणी न्याय
नाशिक : सिन्नर फाटा येथील एका हॉटेलमधील कामगाराची हत्या केल्याप्रकरणी तिघा आरोपीना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत त्यांना जन्मठेप व 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी शुक्रवारी (दि.20) ही शिक्षा सुनावली.
अमोल सूर्यभान सहाणे, पवन त्र्यंबक बोरसे व अंकुश शिवाजी नाठे असे तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांनी कृष्णा उत्तमराव नागे (रा. शेलू, ता. बारशी टाकळी, जि. अकोला) याची गळा दाबून व फरशी डोक्यात घालून हत्या केली होती. 29 मार्च 2017 रोजी ही घटना घडली होती.
काय होता गुन्हा?
कृष्णा नागे हा सिन्नरफाटा येथील बजरंग हॉटेलमध्ये कामाला होता. दिवसभर काम करून तो रात्री दारु प्यायचा. दारुच्या नशेमध्ये अनेकांना तो शिवीगाळ करायचा. दारुवरून आरोपी अमोल सहाणे याच्याशी त्याचे वाद झाला होता.
रात्रीच्या वेळी कृष्णा दारुच्या नशेत असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून सहाणे याने सामनगाव रोडवरील अरिंगळे मळ्यात त्याचा गळा दाबला. तर, पवन बोरसे व अंकुश नाठे यांनी कृष्णा यास मारहाण करत त्याच्या डोक्यात फरशी टाकली.
या घटनेत कृष्णा हा जागीच ठार झाला. त्यानंतर तिघा आरोपींनी रिक्षातून (एच. एच.15, झेड.1733) कृष्णा याचा मृतदेह दारणा नदीच्या पूलाजवळ फेकून दिला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघा आरोपींना अटक केली होती.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्यासमोर खटला चालून सरकारी पक्षातर्फे ऍड. कल्पेश निंबाळकर यांनी 8 साक्षीदार तपासले होते. परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायधीशांनी यांनी तीनही आरोपींना दोषी ठरवले. त्यांना खून प्रकरणी जन्मठेप व दहा हजार रुपयांची शिक्षा व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.