तीन व पाच हजार रुपयात नोंदवता येणार ‘कृषी संजीवनी’त सहभाग

तीन व पाच हजार रुपयात नोंदवता येणार ‘कृषी संजीवनी’त सहभाग

योजनेत सहभागी व्हा; महावितरणचे आवाहन 

नाशिक: मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेणे आता अधिक सोपे झाले असून थकबाकीनुसार तीन किंवा पाच हजार रुपये भरून शेतकऱ्यांना योजनेतील आपला सहभाग निश्चित करता येईल. तर शेतकऱ्यांच्या वीज बिलाविषयी शंकाचे निरसन करण्यासाठी फिडरनिहाय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तेंव्हा ३० नोव्हेंबरपूर्वी संबंधित रकमेचा भरणा करून शेतकऱ्यांनी योजनेतील सहभाग निश्चित करावा, असे आवाहन मुख्य अभियंता  दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

शेतकऱयांना वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली. आता या योजनेतील सहभाग वाढविण्यासाठी आणखी सोपा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वीजबिलाची ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असणारे शेतकरी तीन हजार तर ३० हजारांपेक्षा अधिकची थकबाकी असलेले शेतकरी पाच हजार रुपये भरून योजनेत सहभागी होऊ शकतात. वीज बिलाविषयीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १ ते ३० डिसेंबरपर्यंत फिडरनिहाय कृषिपंप ग्राहकांचे शिबीर घेण्यात येईल. या शिबिरातून शेतकऱ्यांच्या बिलविषयक प्रश्नांचे समाधान करण्यात येणार आहे.

नाशिक परिमंडलातंर्गत येणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६२ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ३ हजार ४६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात नाशिक जिल्ह्यातील ३ लाख ५ हजार शेतकऱ्यांकडे वीजबिलाची ११८३ कोटी रुपये एकूण तर दंड व व्याजाची रक्कम वगळता ७६६ कोटी रुपये मूळ रक्कम थकीत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९० हजार शेतकऱ्यांनी ४१ कोटी ४० लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे. मालेगाव मंडलातील मालेगाव, मनमाड, सटाणा व कळवण विभागातील ४६ हजार शेतकऱ्यांनी १८ कोटी ६५ लाख तर नाशिक शहर मंडलातील नाशिक शहर एक आणि दोन, नाशिक ग्रामीण व चांदवड विभागातील ४४ हजार कृषिपंप ग्राहकांनी २२ कोटी ७४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. नव्याने देण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घेत उर्वरित शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबरच्या आत भरणा करून योजनेतील सहभाग निश्चित करावा, असे आवाहन मुख्य अभियंता  कुमठेकर, नाशिक शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता  सुनील पावडे, मालेगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता  शैलेंद्र राठोर यांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.