कांद्याचा भाव पाडण्यासाठीच युती सरकारने निर्यातमुल्य वाढविले

कांद्याचा भाव पाडण्यासाठीच भाजप – शिवसेना युती सरकारने शेतकरी विरोधी धोरण स्विकारून निर्यातमुल्य वाढविले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केला आहे.

 केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मुल्य ८५० डॉलर प्रती मे. टन करण्याचा घेतलेला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने हा निर्णय त्वरीत रद्द करून कांद्यावरील किमान निर्यात मुल्य शून्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली आहे.

वरील मागणीच्या निवेदनाची प्रत माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री ना.राधामोहन सिंग, राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.

भाजप – शिवसेना युती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी सर्वबाजूंनी अडचणीत सापडला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा भाव मिळण्यास सुरुवात झाली होती. हा भाव पाडण्यासाठीच युती सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य ८५० डॉलर प्रती मे. टन केले आहे. सरकारचा निर्यात मुल्य वाढविण्याचा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने केंद्र सरकारने शेती व्यवसाय वाचविण्यासाठी वरील निर्णयाचा फेरविचार करून कांद्यावरील किमान निर्यात मुल्य पूर्णपणे रद्द करावे असेही अॅड. रविंद्र पगार यांनी म्हटले आहे.

          केंद्र सरकारकडून कांद्यावरील किमान निर्यात मुल्य वाढवून एक प्रकारे अघोषित कांदा निर्यात बंदी करण्याचा प्रयत्न होत आहे. मार्च २०१४ मध्ये नाशिक दौऱ्यावर असलेले तत्कालीन कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांना शेतकऱ्यांनी ९०० डॉलर प्रती मे. टन असलेले किमान निर्यात मुल्य कमी करावे असे साकडे घातल्यानंतर तात्काळ दिल्लीला जाऊन कांद्यावरील किमान निर्यात मुल्य संपूर्णपणे रद्द केले होते. परंतु सध्याचे युतीचे सरकार हे सातत्याने निर्यात धोरणांत बदल करत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय शेतपिकांची पत कमी होण्याची भीती वाढत आहे.

           शेतकरी बांधव अवकाळी पाऊस, गारपीट, पिकांवरील रोग यांसारख्या अस्मानी संकटांनी हतबल झालेला असतानांच भाजप-शिवसेना युती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सुलतानी संकटाने देखील वेढला गेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सहानुभूती पूर्वक विचार करून किमान निर्यात मुल्य वाढीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.