ईपॉस मशिनद्वारे खतांची विक्री न केल्यास खत विक्री परवाना होणार रद्द

येवला । विलास कांबळे

अनुदानित रासायनिक खत विक्री करताना ई-पॉस यंत्राचा वापर करून विक्रेत्यांनी अनुदानित खतांची विक्री करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा परवाना अधिकारी पडवळ यांनी केले. अनुदानित खताची विक्री करण्यासाठी ई-पॉस मशिनचा वापर करणे बंधनकारक असुन त्यांनी ई-पॉस मशिनचा वापर न केल्यास त्यांचा खतविक्री परवाना रद्द करण्यात येणार आहे.असा सक्त इशारा  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा परवाना अधिकारी पडवळ यांनी दिला.

तालुक्यातील किरकोळ व घाऊक खत विक्रेते यांना ई-पॉस मशिन  वापरबाबातची माहिती देण्यासाठी येवला तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे आयोजित प्रशिक्षण वर्गाचे प्रसंगी ते बोलत होते. शेतकर्‍यांसाठीच्या निधीचा गैरवापर होऊ नये, यासाठी सरकारने शेतकर्‍यांनी

खरेदी केलेल्या प्रत्येक खताची नोंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांचे आधारकार्ड क्रमांक नोंदवून खतांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ई-पॉस यंत्राच्या मदतीने आधारकार्ड क्रमांक नोंदवून झालेल्या खत विक्रीलाच अनुदान देण्यास सरकार बाध्य असणार आहे. यामुळे ही योजना राबविण्याची जबाबदारी प्रामुख्याने रासायनिक खत कंपन्या आणि त्यांच्या वितरकांवर राहणार आहे. शेतकर्‍यांना अनुदानित रासायनिक खत घेताना आधारकार्ड व सातबारा उतारा दाखवावा लागणार आहे. विक्रेत्याकडील ई-पॉस यंत्रावर आधारकार्डची नोंदणी केल्यानंतर अनुदानित खते मिळणार आहेत.

शेतकर्‍यांनी आधारकार्ड क्रमांक टाकण्यास मदत करणे हे त्यांच्याच फायद्याचे आहे. शेतकर्‍यांनी खत खरेदीनंतर पावती घेण्यास विसरू नये असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी कापुस बोंडअळी नियंत्रणासाठी पिकांमध्ये लावण्यासाठी कामांध सापळे शेतकर्‍यांना उपलब्ध करुन देण्यास सांगीतले. तसेच पिकांचे सर्वेक्षण करुन गरजेनुसार किटकनाशके व बुरशी नाशकाची फवारणी करण्यासाठी गावपातळीवर एकाचवेळी उपाययोजना केल्यास बोंडअळी  नियंत्रण सहन शक्य होईल असे सांगण्यात आले. या प्रशिक्षणासाठी उपविभागीय कृषि अधिकारी वाघ, तालुका कृषि अधिकारी फलके, कृषि अधिकारी धात्रक, प्रशांत वास्ते यांचेसह तालुक्यातील खत विक्रेते उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.