युवकांनी शेती उद्योगांकडे वळावे – कुलगुरू

युवकांनी शेती उद्योगांकडे वळावे कुलगुरू

नाशिक : प्रतिनिधीभारताची अर्थव्यवस्था ग्रामीण भागावर अवलंबून असून, शेतकरी या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, शेतीवर आधारित उद्योगधंदे वाढीस लागणे काळाची गरज आहे. युवकांनी नोकरीमागे न धावता शेती आधारित उद्योगांना प्राधान्य द्यावे. नोकरी मागणारे न बनता नोकरी पुरविणारे अशी ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान केंद्रामार्फत ‘जनावरांचे आरोग्य व्यवस्थापक’ आणि ‘आळंबी उत्पादन’ या दोन विषयावर आजपासून प्रत्येकी ३० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील आणि आडगाव येथील पशुधन व्यवस्थापन पदविका विद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर हे होते.

डॉ. दिलीप म्हैसेकर पुढे बोलताना म्हणाले, युवकांनी स्वयंरोजगार निर्माण करावेत. स्वयंरोजगाराची गरज ओळखूनच कृषिविज्ञान केंद्रामार्फत कौशल्याधिष्टीत प्रशिक्षणाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड घालून यशस्वी उद्योजक बनता येते, याची प्रचीती केंद्राने यापूर्वी राबविलेल्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या प्रशिक्षणार्थींना पाहून येते. आज ते मोठे व्यावसायिक बनले असून ग्रामीण भागातील महिलांना व ग्रामीण युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरवीत आहेत. आगामी काळात ग्रामीण युवकांनी उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा; त्यांना कृषिविज्ञान केंद्रामार्फत तांत्रिक ज्ञान पुरविण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

कौशल्य हे यशस्वी उद्योजक बनण्याची पहिली पायरी असल्याचे मत, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी यावेळी व्यक्त केले. महिनाभर चालणाऱ्या या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीनी, संपूर्ण कौशल्य प्राप्त करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. वित्त अधिकारी मगन पाटील यांनी शेतमाल उत्पादनाच्या विपणनाकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज बोलून दाखविली.या प्रशिक्षण कालावधीत जनावरांची निगा, लसीकरण, विविध आजार व त्यांचे निदान, प्राथमिक औषधोपचार तसेच उत्पादन वाढीसाठी शास्रीय दृष्टीकोन संबंधी संपूर्ण प्रशिक्षण ‘जनावरांचे आरोग्य व्यवस्थापक’ या विषयीची माहिती देण्यात येणार आहे. तसेच आळंबीचे प्रकार, स्पॉन तयार करणे, माध्यमे बनविणे, रोगांचे व्यवस्थापन, वातावरणातील घटक नियंत्रण, बेड भरणे व एकूणच आळंबी उत्पादन करणे यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.जनावरांचे आरोग्य व्यवस्थापक या प्रशिक्षणासाठी कृषिविज्ञान केंद्राचे पशुसंवर्धन तज्ञ डॉ. श्याम पाटील तर आळंबी उत्पादन या प्रशिक्षणासाठी गृहविज्ञान तज्ञ सौ. अर्चना देशमुख मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषिविज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी केले. सूत्रसंचलन विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी केले व पशुसंवर्धन तज्ञ डॉ. श्याम कडूस यांनी आभार मानले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील ४० प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला आहे.

फोटो ओळ :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कृषिविज्ञान केंद्रामार्फत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर. समवेत कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील आणि प्राचार्य डॉ. चंद्रशेखर परदेशी.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.