१ जून पासूनच्या संपाला शेतकरी वाचवा अभियानाचा पाठिंबा

नाशिक : नगर जिल्ह्यातील पूणतांबे येथील राज्यव्यापी शेतकरी संप समन्वय समितीच्या बैठक पार पडल्यानंतर ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी निगडित संस्था, संघटना येत्या १ जून पासून होणाऱ्या शेतकरी संपात सहभागी होणार आहेत.

याचा पार्श्वभूमीवर शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्य करणाऱ्या तसेच शेतकरी हेल्पलाईनच्या माध्यमातून अनेक वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांसाठी धावून जाणाऱ्या शेतकरी पुत्रांनी स्थापन केलेल्या शेतकरी वाचवा अभियान शेतकरी संपात पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी झटणाऱ्या सर्वच सहयोगी संघटना शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत अशी माहिती संघटनेचे प्रवर्तक राम खुर्दल यांनी दिली आहे.
या ऐतिहासिक शेतकरी संपात तळागाळातील शेतकऱ्यांना तसेच शेतीसंलग्न व्यवसायांना सोबत घेऊन शेतकरीविरोधी धोरणांना हाणून पाडण्यासाठी या सर्व संघटना जनजागृतीला लागले आहेत. शेतवस्तीवरील शिवार सभा, चावडी सभा, गाव गावात चौक सभा, एकपात्री प्रयोग, पत्रके व फ्लेक्स या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे.
दरम्यान शेतकरी संपात फूट पडणाऱ्या व्यवस्थाही सक्रिय झाल्या असल्यामुळे शेतकरी एकजुटीने या विरोधाला मोडून काढणार आहे. असे एकूण चित्र जिल्हाभरातील शेतकरी संवाद भेटींमध्ये आढळून आले असे बैठकीतील चर्चांदरम्यान समोर आले.
एकूणच महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ यापाठोपाठ नाशिक जिल्हाही शेतकरी आत्महत्यांच्या दुर्दैवी घटनांमुळे होरपळून निघाला आहे. यावर्षी शेतीमालाला मातीमोल बाजारभाव भेटल्याने कांदा, द्राक्ष, ऊस, भाजीपाला, डाळिंब, टोमॅटो, फळे यांना मातीमोल किंमत मिळाली. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले आहे. त्यामुळे शेतकरी समूळ कर्जमुक्त करण्यासाठी स्वामिनाथन आयोग सरकारने तातडीने लागू करावा. शेतीमालाला सरकारने उचित बाजारभाव द्यावा यासाठी शेतकरी संपात सहभागी होणार आहे.

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राम खुर्दळ यांनी लिहिलेली वास्तववादी कविता खाली देत आहोत.

शेतकरी म्हणतो,
मी राबतो मी कष्टतो,
माझ्या वाटेवर सरकार का काटे पेरतो?
मी त्यांना दुय्यम वाटतो
माझे आयुष्य मी मातीत राबतो,
मातीत लाखो पेरतो,
निसर्गाच्या भरवश्यावर आयुष्य कठतो,
जिंदगी माझी मला कळली,
सत्तेत जो येतो त्याने माझी वाटच लावली,
माझ्या वाटा आसमानी सुल्तानी ,
कर्जाच्या खाईत माझी जिंदगानी,
पेरले ते पोरागत वाढवितो,
पिकल ते बाजारात नेतो,
बाजारात जो येतो तो माझ्या पिकाचा भाव ठरवितो,
मी मात्र गप्प बघत सगळ भोगतो,
गेल्या कित्येक पिढ्या,
अश्याच माझ्या,
अडचणीत कर्जात महागाईत मीच होरपळतो,
घरात माझ्या अनंत अडचणी,
माझ्याच घरात पोरसोर उपाशी,
माझी भावंड रोज मरतात,
स्वतः चे सरण डोळ्यासमोर ठेवून आम्ही जगतो,
अडवले, नाडवले तेव्हा मीच रडतो,
ज्याच जळत त्याला कळत,
माझ्या वाटेला शत्रु काटे पेरतो,
आता किती भोगु, किती सोसु,
अजुन किती जीवाचे सरन?
आता तरी देवा तू दुष्मनाला हरवं,

राम खुर्दळ, (निमंत्रक) शेतकरी वाचवा अभियान, महाराष्ट्र

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.