प्रत्येक गरजू रुग्णावर उपचाराची संधी – जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानातून जिल्ह्यातील  प्रत्येक गरजू रुग्णावर उपचाराची संधी राधाकृष्णन बी.

नाशिक,पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत 1 मे ते 27 मे या कालावधीत पोहोचण्याची व त्याची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार असून चांगले नियोजन केल्यास पथदर्शी अभियानातील सहभागी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक उत्कृष्ट  काम करणारा जिल्हा ठरेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.

     पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पथदर्शी तपासणी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील वैद्यकिय रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव कालीदास चव्हाण, उपकुलसचिव विद्या ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे आदी उपस्थित होते.

राधाकृष्णन  म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून सेवेची संधी असून सामान्य लोकांच्या आवाक्यात नसलेल्या किचकट मोठ्या आजारांवर उपचार देणे शक्य आहे. जिल्ह्यातील 50 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करणे गरजेचे असून त्यांना नामांकित डॉक्टर्स व रुग्णालयाच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी यासाठी चांगले योगदान द्यावे. कनिष्ठ डॉक्टरांना निदाना करण्यासाठी मदत व्हावी म्हणून वैद्यकिय तज्ज्ञांचा सल्ला मिळावा म्हणून नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) निर्माण करावे अशी सूचना त्यांनी केली.

आरोग्य विभागाच्या कामावर टिका होत असते पण याला उत्तर देण्यासाठी हे अभियान चांगली संधी असून नाविन्यपूर्ण चांगल्या संकल्पनेच्या माध्यमातून अभियानात आदर्श काम करणारा जिल्हा म्हणून नाशिकचे नाव व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. गरज भासल्यास यासाठी इतर यंत्रणांचा सहभाग घेता येईल, असे त्यांनी सांगीतले.

यापूर्वी नाशिक येथे 1 जानेवारी रोजी झालेल्या महा आरोग्य शिबीरामध्ये दीड लाख लोकांची तपासणी करुन 50 हजार रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे उपचार करता आले असे जिल्हाधिकारी म्हणाले.

डॉ. जगदाळे म्हणाले, अभियानातील प्रत्येक रुग्णावर उपचार होण्यासाठी शासकिय योजना, कंपन्यांचा सीएसआर निधी आणि समाजसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. अभियानावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शासनाच्या सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ठरविलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये अभियानांतर्गत पूर्व तपासणी केली जाईल. रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आशासेविका, परिचारीका, अनुलोम ही समाजसेवी संस्था  काम करेल.

डॉ. वाकचौरे म्हणाले, अभियानात 20 आजारांनुसार रुग्णांची नोंद करण्यात येणार असून त्यांचे वर्गीकरण आणि कार्यवाहीसाठी ‘स्पर्श’ ही संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. महाआरोग्य शिबीरामध्ये पाच दिवसांच्या कमी कालावधीत पूर्व तपासणी करुन  शिबीरासाठी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. पण या अभियानातील मोठ्या कालावधीमुळे दुर्गम भागातील रुग्णापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. नेहमीच्या आरोग्‌य योजनेतून उपचार शक्य नसल्यास मुख्यमंत्री मदत निधीतून उपचारांसाठी मदत केली जाईल.

उपसचिव श्री. चव्हाण म्हणाले स्वस्थ महाराष्ट्र अभियानाच्या पथदर्शी तपासणी मोहिम सहा जिल्ह्यात राबवण्यात येणार असून त्यामध्ये नाशिकची निवड झाली आहे.

डॉ.डेकाटे म्हणाले, झोपडपट्टीतील गरीब लोकांपर्यंत हे अभियान नेण्यासाठी 1 मे रोजी लोकप्रतिनिधीं, नगरसेवकांच्या सहभागाने प्रत्येक प्रभागात शुभारंभ कार्यक्रम करण्यात येईल. ठरविण्यात आलेल्या 20 आजारांमध्ये नोंद होऊ न शकल्यास संशयित रुग्ण म्हणून नोंद करण्यात येऊन सर्व रुग्णांपर्यंत लाभ पोहोचवावा. यावेळी डॉ. वाकचौरे यांनी अभियानाबद्दल माहितीचे सादरीकरण केले तसेच स्पर्श प्रणालीच्या वापराबाबत तंत्रज्ञ श्री.शिंदे यांनी सादरीकरण केले.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.