महाराष्ट्रदिन: शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर विशेष भर-पालकमंत्री गिरीष महाजन

शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर विशेष भर-गिरीष महाजन

नाशिक शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू ठेऊन यावर्षाच्या अर्थसंकल्पात कृषीक्षेत्राच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून शाश्वत शेती आणि शेतकऱ्याच्या सक्षमीकरणासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे श्री.महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदत अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल,  विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे ,मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर आदी उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले, शासनाने ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान सुरू केले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी उत्पादनात वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 26 अपूर्ण प्रकल्प मार्गी लागणार आहेत. पाणीपट्टीतून कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

 राज्य शासनाने गाळ निष्कासनाचे धोरण मंजूर केले आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबर सिंचन क्षमतादेखील वाढणार आहे, शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांचा दीर्घकालीन लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री महाजन यांनी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेत यशस्वी ठरलेल्या ग्रामपंचायतींचे तसेच जलयुक्त शिवार अभियानात राज्य स्तरावर यशस्वी ठरलेल्या चांदवड तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले. जिल्ह्यात हागणदारीमुक्त गाव मोहिम वेगाने राबविण्यात येत असून त्यासाठी सर्वांनी मिळून अधिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी ‘मेक इन नाशिक’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. कृषीपूरक उद्योग जिल्ह्यात यावेत यादृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येणार असून त्याचा उद्योजकांसह शेतकऱ्यांनाही  लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांचा गुणवान व होतकरू विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला वंदन

महाराष्ट्र दिनानिमित्त शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. परेड कमांडर जयंत बजबळे आणि सेकंड परेड कमांडर रामदास पालशेतकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तालय नाशिक, पोलीस अधीक्षक ग्रामीण, गृहरक्षक दल, शहर वाहतूक शाखा,  अग्निशमन दल, वन विभाग, पोलीस बँड पथक, डॉग युनिट वाहन, जलद प्रतिसाद पथक, ॲनिमल रेस्क्यु व्हॅन आणि प्रादेशिक परीवहन विभागाच्या पथकाने संचलनात सहभाग घेतला. पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान, निवडणूक शाखा, पुरवठा विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विकास विभागाचे चित्ररथ संचलनातील प्रमुख आकर्षण होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.