लासलगाव : रेल्वे करतेय कांद्यासाठी कोल्ड स्टोरेजची उभारणी

कांद्यासाठी कोल्ड स्टोरेजची उभारणी

 राज्यातील शेतीमालाचे मुल्यवर्धन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना भारतीय रेल्वेचे सहकार्य लाभले असून लासलगाव (जि.नाशिक) येथे रेल्वे आणि खरेदी विक्री संघाच्या संयुक्त प्रयत्नातून ओनियन कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 जुलैला त्याचे भूमिपूजन होत आहे.

राज्यातील अशा स्वरुपाचे हे पहिलेच कोल्ड स्टोरेज उभे राहणार आहे. लासलगाव ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून या परिसरात विविध फळ पिकांचे उत्पादनही लक्षणीय प्रमाणात होत असते. येथील खरेदी विक्री संघ आणि रेल्वे मंत्रालयाचे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात या स्टोरेजच्या उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात येत आहे. त्यानुसार लासलगाव खरेदी विक्री संघाकडून कंटेनर कॉर्पोरेशनला जवळपास सात एकर जागा देण्यात येत आहे.

या जागेच्या काही भागावर कोल्ड स्टोरेज उभारण्यात येईल. याच जागेवर संघाची एकूण दोन हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेची दोन वेअर हाऊस असून त्याचीही या प्रकल्पाला मदत होणार आहे. कंटेनर कॉर्पोरेशनकडून देशभरात कोल्ड स्टोरेजची साखळी स्थापित करण्यात येत असून त्याअंतर्गत हा उपक्रम आकारणार आहे. रेल्वेकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून (सीएसआर) पाच कोटींची मदत करण्यात आली असून गरज भासल्यास अधिकचा निधीही देण्याची तयारी रेल्वेने दर्शविली आहे.

या कोल्ड स्टोरेजची क्षमता दोन हजार मेट्रिक टनांहून अधिक असेल. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळ बागायतदारांचीही मोठी सोय होणार आहे. तसेच या प्रकल्पाचा काही भाग विविध उपयोगांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यात फळ पिकांवरील राईपनींग, प्रिकुलींग चेंबर आदी सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षे, डाळिंब, आंबा आदी फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूक व मुल्यवर्धन होणार आहे. वर्षभरापेक्षा कमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत सहाय्यभूत ठरणाऱ्या या प्रकल्प उभारणीसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतलेला पुढाकार आणि आवश्यक ती मदत करण्याच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानले आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.