वातावरणातील बदल :कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ

लासलगाव भरदुपारी कडक ऊन आणि ढगाळ वातावरणानंतर  पुन्हा एकदा लासलगाव शहर आणि परिसरातील काही भागांमध्ये पावसाचा शिडकावा झाल्याने कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाट आणि रिमझिम पाऊस पडल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण झालेले आहे.उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात बाजार समितीत विक्रीसाठी दाखल झालेले असून अचानक बदललेल्या वातावरणामुळे प्लास्टिक कागद घेण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ दिसून आली.

मागील आठवड्यात असाच अवकाळी पाऊस पडलेला होता. ढगाळ वातावरणामुळे हाती आलेले द्राक्ष आणि कांदा पिक यांचे काय होणार, या चिंतेने शेतकर्यांना ग्रासले आहे. ढगाळ वातावरणाचे मळभ दाटल्याने कांदा उत्पादकांना अस्वस्थ केले आहे. वातावरणात अचानक होणारे बदल पिकाची परीक्षा पाहणारे ठरतात. निफाड तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर झाला असून अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाने इथला शेती व्यवसाय संकटात सापडल्याने कष्टकरी शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आहोरात्र काबाडकष्ट करून जोपासलेली शेतशिवारे अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त होत असल्याने बळीराजाच्या मेहनतीवर वरवंटा फिरला असून हातातोंडाशी आलेला घास लहरी निसर्ग हिरावून घेतल्याने बळीराजा या थैमानापुढे पुरता हतबल झाल्याचे दिसत आहे. गेल्या तीन – चार वर्षांपासून निसर्ग असाच कित्ता गिरवत असल्याने जगाच्या पोशिंद्यासमोर उभे ठाकलेले हे अस्मानी संकट अधिक गहरे होताना दिसत आहे.

शेतकरी म्हणून जगताना जगण्याच्या असह्य होत चाललेल्या वेदनेवर ज्याने फुंकर घालायची तेच आभाळ साता जन्माचे वैर काढवे असे वागत असल्याने आता जगण्याची असहाय्य होत चाललेली कैफियत मांडायची तरी कुणाकडे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली शेतपीके अवकाळी पावसात जमीनदोस्त झाल्याने कष्टकरी शेतकर्यांच्या डोळ्यातूनही आसवांचा पाऊस पडतोय.

या अवकाळी पावसाने जगाच्या पोशिन्द्याच्या मेहनतीवर पाणी फेराले आहे.  निफाड तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अवकाळी पाऊस व गारपीट होत असून त्याचा इथल्या शेती उद्योगावर विपरीत परिणाम झाला आहे. निर्यातक्षम द्राक्ष, दर्जेदार कांदा, डाळींब आदी पिकांचे उत्पादन घेण्यात व नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून आधुनिक शेती जोपासण्याकडे कल असलेल्या निफाड तालुक्यातील शेती व्यवसायाला या आस्मानी संकटामुळे जबरदस्त हादरा बसला आहे.

कांदा उत्पादक संकटात
पाऊस आणि गारपीट यांच्यामुळे पिकांच्या झालेल्या हानीचे दूरगामी परिणाम दिसत आहे. एकतर बाजार समित्यांमध्ये कांद्याला भाव नाही आणि त्यात अवकाळी पाऊसचा कहर सुरू असून शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. अशा कांद्याचे करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते. राष्ट्रीय पातळीवर कांद्याचे भाव गडगडले किंवा वाढले तरी त्याचा परिणाम थेट नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांवर होतो. यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कांद्याची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली. ऐन काढणीवर कांदा आला असताना पाऊसाचे थैमान सुरू झाले. त्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.