छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन

नाशिक: येवला मतदारसंघातील लासलगांव-विंचूर परीसरातील विद्युत  रोहित्र जळाल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर सुस्थितीमधील नवीन रोहित्र उपलब्ध होण्यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून विंचूर  येथे ट्रान्सफार्मर भवन मंजूर केल्याची माहिती छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील रोहित्र जळाले किंवा नादुरुस्त झाले तर त्याठिकाणी नवीन सुस्थितीमधील रोहित्र लवकर बसविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ट्रान्सफार्मर भवन उभारण्याचा महावितरण कंपनीने  निर्णय घेतला आहे. निफाड तालुक्यात विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन उभारण्यासाठी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी आर्थर रोड कारागृहातून पत्रव्यवहार केलेला होता. त्यामुळे विंचूर येथे ट्रान्सफार्मर भवन बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेतून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. सदर ट्रान्सफार्मर भवनासाठी सुमारे ५२.३५ लक्ष खर्च येणार आहे.

येवला मतदारसंघात असलेल्या निफाड तालुक्यातील ग्राहकांना अखंडित व नियमित वीजपुरवठा मिळावा यासाठी छगन भुजबळ हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. लासलगांव-विंचूर परीसरातील गावांमधील रोहित्र जळाले किंवा नादुरुस्त झाले तर ते जमा करण्यासाठी आणि नवीन रोहित्रासाठी चांदवड-नाशिकला जावे लागत असे. मात्र आता विंचूर  येथे ट्रान्सफार्मर भवन होत असल्यामुळे शेतकऱ्यांची सोय होणार आहे. नुकतेच येवला येथे सुद्धा महावितरण निधीतून ट्रान्सफार्मर भवन मंजूर झाले असून त्याचे काम सुरु झालेले आहे. येवला व विंचूर या दोन्ही ठिकाणी ट्रान्सफार्मर भवन होत असल्यामुळे येवला मतदार संघातील नादुरुस्त रोहीत्रांची ने-आण करण्याच्या कालावधीमध्ये बचत होवून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी व महिलांना विशेषतः वीजेअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विंचूर  येथे उभारण्यात येणाऱ्या या ट्रान्सफार्मर भवनाचे बांधकाम झाल्यानंतर येथे अद्ययावत तंत्रज्ञान व मशिनरी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील वीजेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे बाळासाहेब लोखंडे यांनी सांगितले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.