सायकल वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान सायकल वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची आस

नाशिक : नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशन आणि दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड आयोजित पंढरपूर सायकल वारीचे आज शुक्रवार (दि. 13) विठ्ठल हरिनामाच्या गजरात उत्साहात प्रस्थान झाले. सकाळी ठीक साडेसहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिक सायकलीस्ट्सचे मार्गदर्शक हरिषजी बैजल, दातार जेनेटिक्सचे मिलिंद अग्निहोत्री यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत वारीसाठी 500 हुन अधिक सायकल वारकरी रवाना झाले. तत्पूर्वी नाशिक रोड स्थित भजनी मंडळाने भजने सादर केली तर प्रसिद्ध गायिका गीता माळी यांनी आपल्या मधुर आवाजात विठ्ठलाची दोन भक्तीगीते ऐकवत वारकऱ्यांच्या उत्साहात भर घातली.

नाशिक सायकलीस्ट्स पंढरपूर सायकल वारीचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढती आहे. यावर्षीच्या सायकल वारीचे प्रमुख आकर्षण असलेला सायकल रथ लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी या रथासोबत कुतूहलाने फोटो काढले.

या वारीमध्ये पटीसीच्या प्रिन्सिपल स्वाती चव्हाण, नगररचना विभागाच्या सहआयुक्त प्रतिभा भदाणे, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे सहाय्यक आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अशोक नखाते, माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी, नगरसेवक संतोष गायकवाड, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकुमार देसाई, ऍड. दिलीप राठी, राजेंद्र भावसार यांंच्यासह 500 सायकलीस्ट्स वारकरी सहभागी झाले आहेत.

पहिल्या दिवशी 165 किमीचं अंतर कापत वारकरी अहमदनगर शहरात पोहचणार असून तत्पूर्वी सिन्नर येथे सिन्नर सायकलीस्ट्स ग्रुप कडून वारीचे मोठ्ठया उत्साहात स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष रामभाऊ लोणारी यांच्या हस्ते सायकलीस्ट्स वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. सिन्नर येथून 40 हुन अधिक सायकलीस्ट्स सायकल वारीत सामील झाले.

पुढे नान्नज गावात सायकल वारीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात करण्यात येऊन नाशिक सायकलीस्ट्सचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया आणि पदाधिकाऱ्यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. वसंत फड, नितीन फड, सुभाष फड, विनायक गुंजाळ, किसन चत्तर, दिनकर चत्तर, भाऊसाहेब फड, सदाशिव फड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वारीत करण्यात आलेल्या संकल्पाप्रमाणे सायकलीस्ट्सचे सक्रिय सदस्य राजेंद्र नाना फड यांचे मूळ गाव असलेल्या नान्नज आणि वरझडी खुर्द या गावांत देशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. ही रोपे ग्रामस्थांना दत्तक देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी पारंपरिक लेझीम नृत्य सादर केले.

सायकल वारीच्या पहिल्या टप्प्यात अहमदनगर शहरातील हुंडेकरी लॉन्स येथे मुक्काम राहणार असून याठिकाणी भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संपूर्ण वारीच्या मार्गावर सायकल वारीबद्दल कुतूहल असून हिरव्या जर्सीमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक सायकलीस्ट्स वारकऱ्यांना अनेक गावांमध्ये हरी विठ्ठलाच्या नामे हसतमुखाने सदिच्छा दिल्या जात आहेत. एकूणच पहिल्या दिवशीच वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचला असून सर्वांनाच विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे.

ही सायकल वारी यशस्वी होण्यासाठी नाशिक सायकलीस्ट्सचे सचिव नितीन भोसले, उपाध्यक्ष योगेश शिंदे, ऍड. वैभव शेटे, मोहन देसाई, रवींद्र दुसाने, यश देसाई, डॉ. आबा पाटील, आदी प्रयत्न करत आहेत.

सायकल वारीची वैशिष्ट्ये 

सौर उर्जेवर चालणारा सायकल रथ
वृक्षारोपण करून रोपे देणार स्थानिकांना दत्तक
खेडलेकर महाराज पटांगणात सायकल रिंगण
‘शून्य कचरा, शून्य प्लास्टिक’
वयवर्षे १४ पासून 70 वर्षीय वारकरी सहभागी
नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे शहरातून सायकलीस्ट्स सहभागी
सदैव तत्पर सेवेत वैद्यकीय व्यवस्था

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.