शेकरी वाचवा अभियानाच्या माध्यमातून शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी जनजागृती
नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात, मखमलाबादला घेतल्या शेतकरी सभा
नाशिक : ‘मी शेतकरी बोलतोय’ हा संवादरूपी एकपात्री प्रयोग सादर करून बालशाहीर करण मुसळे याने नाशिकच्या बाजार समितीच्याआवार, मखमलाबाद येथे शेतकऱ्यांच्या १ जून पासून होणाऱ्या शेतकरी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. आज (दि. २८ मे) रोजी या संवादरुपी भाषणातून शिवकार्यगडकोट संस्थेच्या बाल शाहीर करण व शेतकरी वाचवा अभियानाचे प्रबोधन प्रमुख ह.भ.प.प्रकाश चव्हाण यांनी संतांचे अभंग गावून, शेतकरी काव्यातून शेतकऱ्यांना शेतकरी संपात सहभागी होण्याची साद घातली.

येत्या १ जून पासून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शेतकरी संप पुकारण्यात आला आहे. आपला शेतीमाल, धान्य, दुध, फळे फुले बाजारात विक्रीसाठी न्यायाची नाही, सरकार विरोधात पूर्ण असहकार पुकारण्याच्या हेतूने शेतकरी संपाची तयारी सुरु आहे. या दृष्टीने नाशिक जिल्ह्यात किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकरी संपाबाबत शिवार सभा, पत्रके वाटणे, शेतकरी बैठका होत आहे. आपल्या गावातील शेतीमाल शहरात येवूच द्यायचा नाही, आठवडे बाजारासह, शेतीमाल, शेती संलग्न व्यवसाय बंद ठेवायचे. यासाठी प्रचार प्रसार प्रबोधन केले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्राम सभांमध्ये संप यशस्वी करून दाखवण्याच्या प्रस्तावास संमती जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा संप हा शेतकऱ्याचा स्वतःचा संप आहे. तो यशस्वी करण्यासाठी जो-तो आपल्या परीने प्रचार प्रसार करीत आहे. त्याचाच भाग म्हणून शेतकरी वाचवा अभियानाने गावोगावी शेतकरी सभा, गाव सभा, चावडी सभा सतत सुरु केल्या आहेत. पत्रकार राम खुर्दळ लिखित ‘मी शेतकरी बोलतोय’ या विषयावर बालशाहीर करण मुसळे याने शेतकरी पात्र हरी या माध्यमातून नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अवघड क्षण, शोषण, यातना मांडल्या. ‘शेतकऱ्यांनो रात्र वैऱ्याची आहे, जागे व्हा, आज काही शिवकाळ नाही त्याकाळी शेतकरी हा समृद्ध होता, एक ही शेतकरी आत्महत्या होत नव्हती. मात्र आज वर्तमानात शेतकरी दुखी: आहे. लाखो शेतकऱ्यांनी गत २ वर्षात हरी प्रमाणे आपला जीव संपवला. आता तर जागे व्हा. अरे तो जात्यात तर तुम्ही सुपात आहात, हे विसरू नका. अशी वेळ येवू देवू नका, आता मरायचं नाही लढायचं.’ अशी साद घालून शेतकऱ्यांना १ जून पासून शेतकरीसंपात सहभागी होण्याची साद घातली.
यावेळी शेतकरी वाचवा अभियानाचे निमंत्रक राम खुर्दळ, संयोजक नाना बच्छाव, प्रबोधन प्रमुख प्रकाश चव्हाण, प्रहार संघटनेचे दत्तू बोडके, अनिल भडांगे, किशोर येलमामे, अभियानाचे कायदेशीर सल्लागार अॅड प्रभाकर वायचळे, किशोर गोसावी, सचिन पानमर,सुशील शिंदे यांनी सहभाग घेतला. शेतकरी वर्ग, गावकरी यावेळी मोठ्या संखेनी सहभागी झाले होते.