आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान

मुंबई, दि. 20 : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. 108 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी 108 हा क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे.

2014 ते जुलै 2019 पर्यंत सुमारे 3 लाख 46 हजार रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध 13 प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत.

 लक्षणीय बाब म्हणजे ही रुग्णवाहिका चाकावरचे प्रसुतीगृह ठरले असून आतापर्यंत पाच वर्षांत 33 हजार प्रसुती या रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. त्यामध्ये 2014 मध्ये 2 हजार 100, 2015 मध्ये 4 हजार 213, 2016 मध्ये 6 हजार, 2017 मध्ये 6 हजार 580, 2018 मध्ये सर्वाधिक 11 हजार 141 तर 31 जुलै 2019 पर्यंत 2 हजार 900 अशा सुमारे 33 हजार गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश मिळाले आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  

या सेवेंतर्गत 937 रुग्णवाहिका राज्यात चालविल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत 22 हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये 18, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण 30 बाईक ॲम्बुलन्स सध्या कार्यरत आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.