पेठ तालुक्यातील इंदिरा आवास योजनेअंतर्गत 64 कुटुंबांना हक्काचे घर मिळाले

मांगोणे ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांनी गरजूंना मिळाले हक्काचे ‘घरकूल’

नाशिक पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याने इंदिरा आवास योजनेअंतर्गत 64 कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे.

नाशिक-पेठ मार्गावरील करंजाळीपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी गावात एकूण 330 कुटुंब राहतात. गावात 65 टक्के कुटुंब भूमीहीन असल्याने तुटपुंज्या कमाईतून घराचे स्वप्न साकार करणे त्यांना शक्य नव्हते.

 खरीपाचा हंगाम संपल्यावर मजूरीसाठी भटकंती ठरलेली आणि त्यामुळे स्वप्नातले घर प्रत्यक्षात आणणे त्यांना शक्य  नव्हते. अशावेळी तरुण ग्रामसेवक दिपक कोतवाल यांनी गटविकास अधिकारी बी.बी.बहिरम यांच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या मनात घराविषयी आशा निर्माण केली आणि अनेकांचे घराचे स्वप्न इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून पुर्णदेखील केले.

गावातील गरीब नागरिकांची घरे मातीची, प्लास्टीकचे आच्छादन असलेली आणि काही ठिकाणी जुन्या कौलांची होती. पावसाळा आला की त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागे. तात्पुरती डागडुजी करून दिवस पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. शासकीय योजना तर होती मात्र अंमलबजावणीत अडचणी होत्या. कोतवाल यांनी पुढाकार घेऊन ग्रामसभेत अडचणींवर चर्चा केली.

वीटांची समस्या दूर करण्यासाठी काही लाभार्थ्यांनी शेतात वीटभट्टी तयार केली. सरपंच उषाताई गवळी यांनी दुकानदारांना विनंती करून उधारीवर सिमेंट मिळवून दिले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने मजूरी केल्यास त्याला 18 हजारापर्यंत मजूरी देण्यात आली. त्यामुळे मजूरी आणि घर असा दुहेरी लाभ त्याला झाला. गावातील अकुशल मजूरांना रोजगार मिळण्याबरोबर रोहयो अंतर्गत 5 हजार 660 मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला.

गावात शबरी आवास योजनेअंतर्गत तीन घरांचे बांधकाम सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक घराचे बांधकाम सुरू आहे. गावात पक्की घरे आणि समोर सिमेंटचे रस्ते यामुळे गावातील राहणीमानही बदललेले चटकन जाणवते ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान या योजनेचे महत्व अधोरेखित करणारे आहे.

इंदिरा आवास योजनेअंतर्गत काम सुरू करताना 35 हजार, पायाचे बांधकाम झाल्यावर 35 हजार, आणि काम पुर्ण झाल्यावर 25 हजार असे तीन टप्प्यात अनुदानाची रक्कम देण्यात आली. लाभार्थ्याचा हिस्सा केवळ 5 हजार होता. त्याला साधारण मिळालेली मजूरी लक्षात घेता एक लाख 18 हजारात पक्के घर तयार झाले.


दिपक कोतवाल, ग्रामसेवक-
ग्रामस्थांनी समन्वयाने काम केल्याने योजना प्रभावीपणे राबविता आली. लोकांना घर मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून कामासाठी ऊर्जा मिळते. आणखी गरजूंनी योजनेचा लाभ देण्याबरोबर गाव  कचरामुक्त करण्याचाही प्रयत्न आहे

हनमंत गाढवे, ग्रामस्थ – जुने घर गळायचे, त्यामुळे पावसाळ्यात खुप त्रास होत असे. आता शौचालय असलेले नवे घर मिळाल्याने खुप समाधान आहे. जागादेखील मोठी आहे. एवढे चांगले घर मिळाले याचा घरातील प्रत्येकाला आनंद आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.