राज्यस्तरीय खुली बॅडमिंटन स्पर्धा : वैदेही, अजिंक्यची उपांत्य फेरीत धडक
नाशिक : नाशिकच्या मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडीयम मध्ये खेळविण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या वैदेही चौधरी, अजिंक्य पाथरकर, अदिती कुटे, विशाखा पवार यांनी आपापल्या गटात उपांत्यफेरीत धडक मारली आहे. गेल्या ४ दिवसापासून चालू असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोचली असून आज(दि.१९) सकाळी ९ वाजेपासून अंतिम फेरीचे सामने खेळविण्यात येणार आहेत.
१९ वर्षाखालील गटात मुलींच्या एकेरीत नाशिकची राष्ट्रीय खेळाडू वैदेही चौधरीने पुण्याच्या सनश्री ढमढेरे १९-२१, २१-११, २१-१४ असे नमवत उपांत्यफेरी गाठली. याच गटात उपांत्यफेरी गाठण्यासाठीच्या झालेल्या सामन्यांत पुण्याच्या तनिष्का देशपांडेने रिया आरोळकर हिचा ११-२१, २१-१५, २१-११ असा पराभव केला. नागपूरच्या राशी लांबेने नाशिकच्या शिल्पी पुसदकरला २१-१४, २१-१६ असे नमवले. पुण्याच्याच पूर्व बर्वे हिने मुग्धा आग्रेचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला.
१७ वर्षाखालील गटात मुलांच्या दुहेरीत अजिंक्य पाथरकर वगळता नाशिकच्या खेळाडूंना उपांत्य फेरी गाठण्यात सपशेल अपयश आले. मुलांच्या दुहेरीत पाथरकर आणि अक्शन शेट्टी या जोडीने केदार भिडे आणि तेजस देव जोडीचा २१-१७, २२-२० असा तर गौरव मिथे आणि रोहन गुर्बानी या जोडीने हर्षल जाधव, सुयोग लोखंडे या जोडीचा २१-१७, २१-१७ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. मुलींच्या एकेरीत पुण्याच्या पूर्वा बर्वेने नागपूरच्या मालविका बनसोडला २१-१३, २१-१९, २१-११ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली. तर रितिका ठाकरने सिमरन सिंघीचा १९-२१, २१-१३, २१-१३ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. पूर्व बर्वे आणि रितिका ठाकर यांच्यात अनित्म सामना रंगेल. तसेच मुलांच्या एकेरीत अमन संजय याने सोहम नावंदर याचा २१-९, २१-९ असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर अक्शन शेट्टी याने रोहन गर्बानी याचा १४-२१, २१-१५, २१-१७ असा पराभव करत अमन संजय विरुद्ध अंतिम सामन्याची लढत निश्चित केली.
१९ वर्षाखालील मुलींच्या दुहेरीत वैदेही चौधरी आणि मुग्धा आग्रे या जोडीने अनघा करंडकर आणि दिव्या हेगडे या जोडीचा२१-८, २१-१३ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तसेच नाशिकच्या अदिती कुटे आणि विशाखा पवार या जोडीने पुण्याच्या सनश्री ढमढेरे आणि तनिष्का देशपांडे या जोडीचा २२-२०, २१-१० असा पराभव केला. मुलांच्या एकेरीत पुण्याच्या आर्य भिवपत्की, साहिल लोखंडे, मुंबईचा दीप रांभिया, ठाण्याच्या अमन संजय यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. अमन संजय विरुद्ध अनिरुद्ध मयेकर यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अमनने २१-१४, १७-२१, २१-१९ असा विजय मिळवला. मुलांच्या दुहेरीत अजिंक्य पाथरकर आणि अक्शन शेट्टी या जोडीने प्रतिक रानडे आणि यश शाह या जोडीचा २१-१७, २६-२४ असे नमवत उपांत्य फेरी गाठली.
१९ वर्षाखालील मिश्र दुहेरीचा अंतिम सामना आजचा खेळविण्यात आला. त्यात दीप रांभिया आणि राशी लांबे या जोडीने मुंबईच्या हर्ष जगधने आणि सिमरन सिंघी यांचा २१-९, २१-१६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.
इतर सामन्यात मुलींच्या दुहेरीत रितिका ठाकर आणि सिमरन सिंघी विरुद्ध आर्या शेट्टी आणि जान्हवी जगताप असा सामना रंगणार आहे.
असे रंगतील अंतिम सामने
१७ वर्षाखालील गट
मुले एकेरी : अमन संजय (ठाणे) विरुद्ध अक्षण शेट्टी (मुंबई)
मुले दुहेरी : अजिंक्य पाथरकर + अक्षण शेट्टी विरुद्ध गौरव मिथे + रोहन गिर्बानी
मुली एकेरी : पूर्वा बर्वे (पुणे) विरुद्ध रितिका ठाकर (नागपूर)